
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज दिवाळीचा सण आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक तेजाने साजरा करण्यात आला. संपूर्ण शाळा आकर्षक कंदिलांनी आणि सुंदर रांगोळ्यांनी सजविण्यात आली होती. या निमित्ताने शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह व एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.
सकाळच्या सत्रात प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध गाणी, नृत्ये आणि छोट्या नाटिकांद्वारे दिवाळीचा आनंद व्यक्त केला. त्यांच्या निरागस सादरीकरणांनी उपस्थितांचे मन मोहून टाकले. दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षक सादरीकरण केले. नृत्य, गीत, नाटिका आणि रामायणावर आधारित नाट्यप्रयोग हे कार्यक्रम विशेष ठरले. या नाट्यप्रयोगात सीता हरण, राम-रावण युद्ध आणि असत्यावर सत्याचा विजय या प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले, ज्याने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
“अंध:कारावर प्रकाशाचा आणि दुःखावर आनंदाचा विजय” हा दिवाळीचा संदेश विद्यार्थ्यांनी सुंदर कलाकृतींमधून साकारला. मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे आणि सहभागाचे कौतुक केले. त्यांनी सर्वांना एकतेचा, प्रेमाचा आणि संस्कृतीचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संदेश दिला. शिक्षिका प्राची कुडतरकर यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या तसेच उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाने सर्वांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व एकात्मतेची भावना दृढ केली.