
सावंतवाडी : कविवर्य डॉ. वसंत सावंत यांनी सिंधुदुर्ग साहित्य संघाचे रोपटे लावले. साहित्य संघान नव कवी-कवयित्रींना संधी दिली. वसंत सावंत यांची कविता ‘मराठी कवितेतील स्वस्तिक’ म्हणून ओळखली जाते. त्यांच्या सर्व कविता अंतर्मुख करणाऱ्या आहेत. खरी कविता जी आहे, ती आपल्या कोकणातील कवींनी दिली आहे. कालही आणि आजही सकस कविता लिहिली जात आहे. साहित्याच्या मुख्य प्रवाहात कोकणातील अनेक कवींनी आपली नाममुद्रा उमटविली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांनी केले. श्रीराम वाचन मंदिर येथील कोजागरी कविसंमेलन प्रसंगी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
कवी केशवसुत सभागृहात सिंधुदुर्ग साहित्य संघ व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रित आणि नवोदीत कवी-कवयित्रींच्या उपस्थितीत कोजागरी कविसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवयित्री डॉ. सई लळीत, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, साहित्य संघाचे कार्याध्यक्ष विठ्ठल कदम, कार्यवाह मनोहर परब, श्रीराम वाचन मंदिरचे कार्यवाह रमेश बोंद्रे उपस्थित होते. प्रा. आसोलकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले.
यावेळी पुरस्कार जाहीर झालेल्या तसेच पुस्तके प्रकाशित झालेल्या कवी-कवयित्रींचा सन्मान मान्यवरांया हस्ते करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो, अजय कांडर, स्नेहा कदम, प्रा. श्वेतल परब, कल्पना बांदेकर, मनोहर परब, विठ्ठल कदम, भाऊ गोसावी, दीपक पटेकर, भरत गावडे तसेच ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीनिवास नार्वेकर आदींचा समावेश होता. प्रारंभी प्रा. शरयू आसोलकर यांनी ‘भाषा हरते, भाषा मरते, घट्ट धरून रहा भाषेची पारंबी..’ ही कविता सादर केली. डॉ. सई लळीत म्हणाल्या, मराठी कवितेला संतांची तेजस्वी परंपरा लाभली आहे. त्यांचे पद्य आजही मार्गदर्शक आहे. कविता आपणाला जगवते. जगण्यासाठी प्रेरणा देते. साधे जेवण ताटात वाढल्यावर त्याला चव असतेच, पण तेच केळीच्या पानावर वाढल्यावर त्या पदार्थांची लज्जत अधिक वाढते. तसेच मराठी व मालवणीचे आहे. मालवणी बोलीभाषा मराठी भाषेची लज्जत अधिक वाढवते. यावेळी त्यांनी सादर केलेल्या‘आज घरवाले येतले..’ या मालवणी कवितेला रसिकांची दाद मिळाली.प्रथम सत्रात प्रास्ताविक साहित्य संघाचे कार्यवाह विठ्ठल कदम यांनी केले. तर आभार खजिनदार राजेश मोंडकर यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात कवी- कवयित्रींच्या उत्स्फूर्त काव्यवाचनाने कोजागरी संमेलन उत्तरोत्तर बहारदार होत गेले. मुकुंद पिळणकर यांची ’मानवता’, रुजारिओ पिंटो यांची ‘कायच कळना नाय’, संध्या तांबे यांची ‘म्हातारी’, आर्या बागवे यांची ‘कसा बसेल विश्वास’, प्रा. भाऊ गोसावी यांची ’इरी इरी फाफरी’, स्मिता नातू यांची ’आयुष्यावर बोलू काही’, मधुकर जाधव यांची ‘आत्महत्या’, सुस्मिता राणे यांची ‘काय काचा काय कळनाच नाय’, स्नेहा कदम यांची ‘युद्ध टाळण्यासाठी’, दीपक पटेकर यांची सुनीत काव्यप्रकारातील ‘मनुष्य बनला मशीन जणू तो..’, कल्पना बांदेकर यांची ‘विजयी पताका’, नकुल पार्सेकर यांची ‘राजकीय बंडखोरीचा बाजार’, सत्यवान साटम यांची ‘देवा आमका गरज आसा..’, आर्या खानोलकर यांची ‘ती..’, सिद्धार्थ तांबे यांची ‘तुमची विकृती..’, महेश सावंत यांची ‘माका काय कळना नाय..’, विजय ठाकर यांची ‘रात्रपाळी’, अजय कांडर यांची ’जगण्याचा भ्रमनिरास होताना...’, मंजिरी मुंडले यांची ‘जीवनगाणे..’, रामचंद्र शिरोडकर यांची ‘घ्या वरणभात’, प्रा. शालिनी मोहळ यांची ‘मुकी अंगाई’, लक्ष्मी धारगळकर यांची ‘प्राजक्त’, ऋतुजा सावंत-भोसले यांची ‘जुन्या जरी असल्या आठवणी’ यांच्यासह श्वेतल परब (ऋण), मधुकर मातोंडकर, हरिश्चंद भिसे, प्रज्ञा मातोंडकर, विठ्ठल कदम, मंगल नाईक-जोशी, तन्वी परब, रामदास पारकर, सत्यवान साटम, अनिल जाधव, यतीन फाटक, सिद्धार्थ तांबे, विजय ठाकर, मनोहर परब, प्रा. एन. डी. कार्वेकर यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन प्रज्ञा मातोंडकर यांनी केले. तर आभार तन्वी परब यांनी मानले. आर्या खानोलकर व तन्वी परब यांच्या कवितांना सर्वोत्कृष्ट कवितांचे डॉ. वसंत सावंत स्मृती पारितोषिक प्रदान करण्यात आले. संमेलनाध्यक्ष डॉ. आसोलकर यांनी प्रत्येकी ५०० रुपयांचे पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.