राजघराण्याची मोठी घोषणा!

▪️ नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी इच्छुक : लखमराजे भोंसले
Edited by: विनायक गांवस
Published on: October 13, 2025 17:33 PM
views 140  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने यासाठी राजघराण्याच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले इच्छुक असल्याची घोषणा, संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी केली. महायुतीच्या नेत्यांशी बोलण सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राजवाडा येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

युवराज लखमराजे म्हणाले, ३५ वर्षांपूर्वी शिवरामराजे भोसले आमदार होते. यानंतर आज नगरपरिषद निवडणुकीत सहभाग घेण्याचा विचार आम्ही केला आहे. महिला आरक्षण पडल्यामुळे आम्ही त्याचा विचार करत आहोत. लोकांची सेवा करण्यासाठी राजघराण इच्छुक आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या नावासाठी महायुतीशी आमचं बोलणं सुरु आहे. सावंतवाडीच्या जनतेनं दिलेलं प्रेम बघता पुन्हा या जनतेची सेवा करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. पक्षाकडे आम्ही यासाठी मागणी करणार आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेणार आहेत. 

दरम्यान, आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. लोकांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा हेतू आहे. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्याशीही आमचं बोलण होत. त्यांच्याशीही आमचं बोलण झालंय. सावंतवाडी शहरात ते बरीच वर्षे नेतृत्व करत आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूकीला सामोरे जाणार आहोत, असे श्री. लखमराजेंनी स्पष्ट केले.

युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, राजकारण माझं क्षेत्र नाही. परंतु, यात काम करण्याची इच्छा आहे. सावंतवाडीसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. शहराचा विकास करण्यासाठी माझा उद्देश राहील. इथली परंपरा जपण्यासाठी माझा प्रयत्न राहील. मी सावंतवाडीकर आहे याचा अभिमान वाटतो. माझा प्रयत्न सावंतवाडीस ग्लोबल स्तरावर आणण्याचा राहणार आहे‌. पर्यटन वाढीसाठी माझा प्रयत्न असेल, लोकांच प्रेम अन् आशीर्वाद माझ्यासह असल्याचे युवराज्ञी म्हणाल्या.

राजेसाहेब खेमसावंत भोंसले म्हणाले, राजकारणात येत सामाजिक कार्य व विकासात्मक काम करण्याचा आमचा हेतू आहे. माझे वडील ५ वेळा आमदार राहीले आहेत. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज, राजेसाहेब शिवरामराजेंचा वारसा पुढे चालवण्यासाठी युवराज लखमराजे राजकारणात सक्रीय आहेत. युवराज्ञी श्रद्धाराजे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. राजघराण्याची १९ वी पिढी राजकारणात येऊ पाहत आहे. दोघेही राजघराण्याचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. ते निश्चितच यशस्वी होतील असा विश्वास राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी व्यक्त केला.