
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या दुरावस्थेसंदर्भात अभिनव फाउंडेशनच्या जनहित याचिके संदर्भात उच्च न्यायालयाने नेमलेल्या सत्य पडताळणी समितीमुळे आणि गेल्या आठवड्यात सावंतवाडी शहरातील व परिसरातील जागरूक नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन केलेल्या स्पाॅट पंचनाम्यामुळे सत्ताधारी राज्यकर्ते आणि आमदार कंपूमध्ये घबराट निर्माण झाली आहे, अशी टीका उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते, डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
ते म्हणाले, सामान्य रुग्णांचे सातत्याने होणारे हाल आणि ससेहोलपट आमदारांना समर्थन देणाऱ्या या महानुभावांना अजिबात दिसत नाहीत. सातत्याने गेली पंधरा वर्षे मतदारांना मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलचे गाजर दाखवून मतं लाटणाऱ्यांना रात्री अपरात्री गोवा मेडिकल कॉलेज हाॅस्पिटल येथे जात असताना झालेल्या मृत्यूबद्दल कणव कशी येत नाही ? हे एक आश्चर्यच आहे. जागरूक नागरिकांनी केलेली पाहणी, सत्य पडताळणी समितीची पाहणी आणि आरोग्य प्रधान सचिव यांचा दौऱ्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले अशी वावडी उठवणाऱ्यांनी थोडी चौकशी करणे गरजेचे होते.
मुळात त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे वगैरे काही दिलेले नाहीत.हे सर्व वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस असून त्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायची इच्छा आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पीजी नीट परिक्षेच्या तयारीसाठी, अभ्यासासाठी त्यांना वेळ हवा आहे, त्यासाठी त्यांनी ही एक महिन्याची नोटीस दिलेली आहे.
जिल्ह्यातील मालवण, ओरोस येथील इतर चार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील अशी नोटीस दिलेली आहे. त्याचा आणि उपजिल्हा रुग्णालयातील पाहणी दौऱ्यांचा काडीमात्र संबंध नाही. आजपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर नाही,आयसीयू कार्यरत नाही, ट्राॅमा केअर युनिट कार्यरत नाही,दिवसागणिक सहा रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेज हाॅस्पिटल मध्ये पाठवले जात आहे ही खरी तर वेगवेगळी मंत्रीपदं उपभोगलेल्या विद्यमान आमदारांवर नामुष्कीची वेळ आल्यासारखे आहे.
सावंतवाडी मतदारसंघ सोडून मुंबईत वास्तव्याला असणाऱ्या आमदारांना सामान्य जनतेबद्दल काडीचीही संवेदना नसल्याचे हे लक्षण आहे. सावंतवाडी अर्बन बॅंक बुडविणाऱ्या आणि अनेक सामान्य ठेवीदारांचे पैसे घशात घालणाऱ्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाबद्दल न बोललेले बरं. पण, नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्यांना खोटं नाटं बोलावं लागतं त्याला ते तरी काय करणार ? असा टोला डॉ जयेंद्र परुळेकर यांनी हाणला आहे.