
सावंतवाडी : चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भविष्य निर्वाह निधीसाठी लढा देणाऱ्या शहरातील ७० साफसफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दुःखाची प्रशासनाने व जनतेने दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. कामगार संघटनेचे नेते बाबू बरागडे यांनी ऋण व्यक्त केले आहेत.
ते म्हणाले, या समस्येवर लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे. आम्ही या शहराचे खरे स्वच्छता दूत आहोत. पण, गेल्या चार वर्षांपासून आम्हाला आमच्या हक्काच्या भविष्य निर्वाह निधीसाठी झगडावे लागत आहे. सुमारे ६५ लाख रुपयांहून अधिक रक्कम ठेकेदारांनी अडवून ठेवली आहे. या संदर्भात कामगार संघटना, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली येत्या १५ दिवसांत ठोस पाऊले उचलली जातील. आम्ही रोज घाणीत काम करतो, ज्यामुळे अनेकदा जेवणही जात नाही. आम्हीही माणसे आहोत आणि आमच्या मुलाबाळांचे शिक्षण आणि कुटुंबाची गुजराण करण्यासाठी हे काम करतो. जर आमच्या कष्टाचे पैसे ठेकेदार खात असतील, तर हे योग्य नाही. आज जर आम्हाला असा त्रास दिला गेला, तर भविष्यात कोणीही हे काम करायला तयार होणार नाही," असे ते म्हणाले.
आमच्यासारख्या गरीब कामगारांचे असे हाल होऊ नयेत. प्रशासनाने आमच्या कष्टाची कमाई आम्हाला मिळवून द्यावी आणि आम्हाला कामावरून कमी करण्याची भाषा वापरणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी. ज्या दिवशी आम्हाला न्याय मिळेल, तो आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असेल. तसेच कामगारांनी त्यांच्या आंदोलनामुळे जनतेला झालेल्या त्रासाची माफी मागितली. ते म्हणाले की, "आम्ही ज्यांच्या सेवेसाठी नेहमी त्यांच्या दारात असतो, त्यांना आमच्या वेदनांची जाणीव आहे. आम्हाला ठेकेदारांबद्दल कोणतीही वाईट भावना नाही. पण, आमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आम्हाला आमच्याच घामाच्या पैशासाठी झगडावे लागते, हे खूप मोठे दुःख आहे. ठेकेदारांनी एकदातरी आमच्या घरी येऊन आमची परिस्थिती पाहावी," अशी भावनिक हाक त्यांनी दिली.