रुग्णालयातली रिक्त पदे भरण्यासाठी सर्व राजकीय मंडळींनी पुढाकार घ्यावा : डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे

Edited by: विनायक गांवस
Published on: September 19, 2025 17:26 PM
views 87  views

सावंतवाडी : रुग्णांच्या फायद्यासाठी सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय होणे काळाची गरज आहे. मात्र, तूर्तास सर्वसामान्य रुग्णांसाठी चांगली सेवा देणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचे महत्त्व कमी होणार नाही, यासाठी सावंतवाडीकरांनी पुढाकार घ्यावा. रिक्त असलेली पदे भरण्यासाठी सर्व राजकीय मंडळींनी पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केली.

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले उपक्रम रुग्ण आणि विशेषता महिलांच्या फायद्यासाठी आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आज येथील उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी तपासणी शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी, माजी नगरसेवक अनारोजीन लोबो, गुरु मठकर, दिपाली सावंत, दिपाली भालेकर, उमाकांत वारंग, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, संजय माजगावकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, दिलीप भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 यावेळी डॉ. ऐवळे म्हणाले, सदस्य असलेल्या सावंतवाडी रुग्णालयाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नंबरची रूग्ण सेवा रुग्णांना उपलब्ध करून दिली जात आहे, ही कौतुकाची बाब आहे. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता काम कसे चालते याचा अंदाज येतो. त्यामुळे मल्टीस्पेशालिटीची मागणी करणाऱ्या सर्वपक्षीयांनी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा भविष्यात कमी होणार नाही यासाठी प्रयत्न करावे. या ठिकाणी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल होणे काळाची गरज आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सारख्या आजारांवर उपचार होणार आहेत. तर प्रसूती किंवा अन्य छोट्या-मोठ्या आजारावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार होणार आहेत. त्यामुळे येथील डॉक्टर आणि रुग्णालयाचा दर्जा टीकविण्यासाठी प्रयत्न करावा. माझ्यासह या ठिकाणी सर्जन असलेले डॉ. पांडुरंग वजराटकर येणाऱ्या काळात निवृत्त होत आहोत. तर दोन डॉक्टरांनी त्यांचा कालावधी संपल्यामुळे बदलीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी चांगले डॉक्टर असणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी या रुग्णालयाचा आलेख कायम उंचावर ठेवला त्याचप्रमाणे यापुढेही हा आलेख तसाच राहावा, यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी येथे येणारे डॉक्टर व त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. काही लोकांकडून रुग्णालयाची बदनामी सुरू आहे, ती थांबणे गरजेचे आहे. सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. 


यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात असलेली गर्दी लक्षात घेता या रुग्णालयात चांगले काम चाललेले आहे, याचा अंदाज येतो. त्याचे श्रेय या ठिकाणी २४ तास सेवा देणाऱ्या डॉक्टरांना जाते. त्यामुळे भविष्यात सुद्धा अशाच प्रकारे रुग्णांना सेवा मिळावी यासाठी सर्वांचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर रिक्तपदे भरण्यासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून कायम पाठपुरावा राहणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, सावंतवाडी रुग्णालयाने नेहमी सकारात्मक काम केले आहे. येथील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता त्याचा आलेख नेहमी उंचावताना दिसतो, ही कौतुकाची बाब आहे. त्यामुळे या रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासाठी आमचे कायम प्रयत्न आहेत. सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा रुग्णांनी फायदा घ्यावा.

 

यावेळी युवराज लखमराजे भोसले म्हणाले, जिल्ह्यातील अन्य रुग्णालयाच्या तुलनेत सावंतवाडी रुग्णालयात चांगली सेवा दिली जात आहे. त्याचा फायदा येथील गोरगरीब रुग्णांना होत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. शासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या योजनांचा जास्तीत- जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रक्तदान संघटनेच्या माध्यमातून काम केल्याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पदाधिकारी कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.