
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ९ वाजल्यापासून नगरपरिषद कार्यालयासमोर 'काम बंद आंदोलन' आणि बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कंत्राटदाराने गेल्या चार वर्षांपासून सुमारे ६५ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी (PF) बुडवल्याचा आरोप करत कामगारांनी हा पवित्रा घेतला आहे. या उपोषणाला पाठिंबा देत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ते उपोषणात सहभागी झाले.
यावेळी "भविष्य निर्वाह निधी आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा!", "कामगार एकजुटीचा विजय असो", "आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे"अशा जोरदार घोषणाबाजीसह ढोल वाजवत सफाई मित्रांनी उपोषण छेडले. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या आंदोलनात कामगारांनी त्यांच्या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. पीएफ बुडवल्याबद्दल संबंधित ठेकेदाराला त्वरित नोटीस बजावण्यात यावी. या प्रकरणी ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, मागील चार वर्षांची थकीत पीएफ रक्कम ठेकेदाराकडून वसूल करून ती कामगारांच्या खात्यात जमा करण्यात यावी, कामगारांना किमान वेतन लागू करावे आणि समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे. वेतन महिन्याच्या ५ तारखेपर्यंत अदा करावे. नवीन सरकारी निर्णयानुसार नवीन टेंडर काढण्यात यावी, नवीन टेंडर काढण्यासाठी १८ महिन्यांचा विलंब का झाला ? याची चौकशी करून या विलंबामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कामगारांना देण्यात यावी. नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तर कामगार आपल्या मागण्यांवर ठाम असून, यावर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, अफरोज राजगुरू, पुंडलिक दळवी, रवी जाधव, राजू बेग, उमेश खटावकर, जॉनी फर्नांडिस, सचिन माड आदींसह सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.