
सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'अमृत महोत्सवी' वाढदिवसानिमित्त देशभरात 'सेवा पंधरवडा' साजरा केला जात आहे. या अंतर्गत १७ सप्टेंबर रोजी सावंतवाडीमध्ये 'डिजिटल फिरता दवाखाना' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून 'आरोग्य आपल्या दारी' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे.
या उपक्रमाची सुरुवात पंतप्रधान मोदी यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या ११ वर्षांत देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे १४० कोटी भारतीयांना 'राष्ट्रहित सर्वोपरि' हा मंत्र मिळाला आहे. 'मै देश को झुकने नहीं दूंगा' या त्यांच्या निर्धाराने विकसित भारताची संकल्पना साकार होत आहे असं मत श्री. परब यांनी व्यक्त केले आहे.
'डिजिटल फिरता दवाखाना' अंतर्गत १०० हून अधिक आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. यामध्ये रक्त तपासणी: हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर (शुगर), हृदय विकारासंबंधी तपासण्या: ई.सी.जी. आणि इतर संबंधित तपासण्या तसेच रक्तदाब (ब्लड प्रेशर), युरिन टेस्ट, वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स (BMI), हाडांची ठिसूळता तपासणी होणार आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तपासणीनंतर अवघ्या ५ ते १० मिनिटांत रिपोर्ट मिळणार आहे. हा उपक्रम विशाल परब यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे.