
सावंतवाडी : बसस्थानकात आज सकाळी एसटी बसच्या मॅकेनिक आणि दुचाकीस्वारामध्ये पार्किंग केलेल्या दुचाकीला धडक बसल्याने जोरदार वाद झाला. बस दुरुस्तीसाठी नेत असताना दुचाकीला धक्का लागल्याने हा वाद सुरू झाल्याचे समजते. ज्यामुळे बसस्थानकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी बसस्थानकावरील बस दुरुस्तीसाठी बाहेर काढत असताना एका दुचाकीला धक्का लागल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे संबंधित दुचाकीस्वार संतापला आणि त्याने मॅकेनिकसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. दुचाकीस्वाराने आरोप केला की, मॅकेनिकच्या चुकीमुळे त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे.
त्यावर मॅकेनिकने देखील तीव्र प्रतिक्रिया दिली. त्याने बसस्थानकात खासगी वाहने किंवा दुचाकी पार्क करण्यास मनाई करणारा बोर्ड लावलेला असतानाही दुचाकी तिथेच पार्क केल्याचे सांगितले. दोघांमधील वाद वाढल्याने बसस्थानकावरील इतर कर्मचारी आणि प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. यानंतर काही कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले. या घटनेमुळे बसस्थानकात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.