
सावंतवाडी : राज्यात हिंदुत्वाचा पुकार करणार फडणवीस-शिंदे-पवारांच महायुती सरकार आहे. मात्र, हिंदूंचा सर्वांत मोठा सण ज्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला गेलाय त्याचा पहिलाच दिवस तळकोकणात अंधारात काढावा लागतोय. तर दुसरीकडं जिथून पेटी-तबल्याचे सूर येण अपेक्षित होता तिथून आक्रोशाचे हंबरडे फुटताना ऐकू येत आहेत. अन् याला जबाबदार आहे ते असंवेदनशील राज्य सरकार अन् गेंड्याची कातडी पांघरलेल शासन.
कोकणचा उत्सव म्हणून गणेशोत्सवाची जगभरात ओळख आहे. मात्र, जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस काही गावांत अंधारात काढावा लागला. सातार्डा-तरचावाडा आणि केरकरवाडा येथील रहिवाशांना महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला. वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, कमी दाबानं पुरवठा होणे यामुळे गणेशभक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पावसाचा जोर जरी असला तरी महावितरणचा कामचोरपणा अन् सरकारच दुर्लक्ष यामुळेच हे घडत आहे. कारण, २५-२५ वर्ष विद्यूत पुरवठा करणारी यंत्रणा बदलली गेली नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अंमलात आणला नाही. जनहीतापेक्षा राज्यकर्त्यांनी स्वहीतासाठी दिलेलं महत्व याला कारणीभूत आहे. यातच वीज वितरण विभाग अदानी, अंबानींकडे हस्तगत करण्यासाठीच सरकार वीज समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचही बोललं जातं आहे.
बुधवारी गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्रीच्यावेळी सातार्डा,साटेली, आरोस व परिसरातील भागासह वीज खंडित झाली होती. तब्बल १५ तासांनी दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता हा पुरवठा पूर्ववत झाला. यामुळे गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस अंधारात घालवावा लागला. सर्वांत मोठा सण अंधारात घालवताना लाडक्या गणरायाच्या उत्सवात वीज समस्येच विघ्न निर्माण झालं. त्यामुळे गणेशभक्तांत तीव्र संतापची लाट उसळली आहे.
यातच, झाराप शिरोडकरवाडी येथे शुक्रवारी सकाळी देवासाठी फुले काढत असताना तुटून पडलेल्या विद्यूत तारेचा धक्का लागून गिरण मालक प्रताप वासुदेव कुडाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे ऐन चतुर्थीत संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मयत कुडाळकर बागेत फुल काढायला गेले असता पावसामुळे झाड़ावर पडलेल्या विद्यूत तारेचा स्पर्श त्यांच्या खांद्याला झाला. या धक्क्यात ते जागीच कोसळले. विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे ऐन गणेशोत्सवात संपुर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अन् याला जबाबदार महावितरण व राज्य सरकारच आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्यांकडे सरकारमधील आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात भर सभागृहात लक्ष वेधलं होत. अनागोंदी कारभारामुळे माणसं, जनावर अन् महावितरणचे कर्मचारी यांचे जीव कसे जातात याची उदाहरण देत, आकडेवारीही मांडली होती. उर्जा राज्यमंत्र्यांनी त्यावर उत्तरांत आश्वासनही दिली होती. दुसरीकडे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनीही शासनाकडे पाठपुरावा केला होता. दस्तुरखुद्द पालकमंत्री तथा बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी देखील महावितरणसह उर्जा खात्याचे प्रमुख, उर्जा मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. मात्र, तरीही सिंधुदुर्गच्या पदरी निराशाच पडली. हकनाक जाणारे बळी काही थांबण्याच नाव घेत नाहीत. सरकार ५ लाखांची नुकसानभरपाई देऊन मेलेल्या व्यक्तीची अन् माणूसकीची पुन्हा एकदा किंमत करेल. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बळी जात असताना डोळे झाकून बसलेलं सरकार कधी जाग होणार ? हकनाक बळी जाण्यास जबाबदार कोण ? असे सवाल सिंधुदुर्गवासीय करत आहेत. एकीकडे, शेतकऱ्यांची जनावरे अन् आता माणसंही मृत्यूमुखी पडत असताना फडणवीसांच ऊर्जा खात करतय तरी काय ? हा खरा प्रश्न आहे. की खासगीकरणासाठीच हे बळी घेण्याचं काम राज्य सरकार करतय हा खरा प्रश्न आहे.
एकंदरीत, सरकार महायुतीच असो वा महाविकास आघाडीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या परिस्थितीत किंचीतही फरक पडलेला नाही. आताच्या सरकारचे काही मंत्री तर दोन्ही सरकारमध्ये पदाला चिकटून बसले होते. मात्र, तळकोकणातील वीज समस्येमुळे जाणारे बळी बघून त्यांच्या मनाला काहीच वाटलं नाही का ? हा प्रश्न पडतो. म्हणूनच, सरकारच्या संवेदना मेल्यात का ? असा सवाल विचारण्याची वेळ आज आली आहे.