
सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी सुरू करण्यात आलेला संगीत कारंजा येत्या आठवडाभरात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या खास लेझर शोच्या माध्यमातून बाप्पाच्या नावांची झलक गणेशभक्त अनुभवत आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ही झलक अनेकांना पाहायला मिळत आहे. हा आगळा- वेगळा अनुभव अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असुन गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या निमित्त हा लेझर शो सुरू करण्यात आला होता. रंगीबेरंगी संगीत कारंजासह हा लेझर शो उठून दिसत होता. याचा फायदा पर्यटनाला निश्चितच होईल असा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला. आमदार केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीच्या मोती तलावात तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च करून हा संगीत कारंजा उभारण्यात आला आहे. या कारंजाच्या टेस्टींगचे काम गेले काही दिवस सुरू आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी लेझर शोचे टेस्टिंग करण्यात आले आहे. यात गणपती बाप्पा मोरया, ओम, श्री गणेश अशी गणरायाची नाव लेझर शोमध्ये पाहायला मिळत आहे. आठवड्याभरात संगीत कारंजा शुभारंभ करून लवकरात-लवकर हा कारंजा पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती ठेकेदार प्रतिनिधी सचिन मोरजकर यांनी दिली आहे.