
सावंतवाडी : यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्या ट्युमरची गाठ काढण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया डाॅ. राजेश नवांगुळ आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महात्मा फुले आरोग्य योजनेतील ही या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची पहिलीच लॅप्रोस्कोपी शस्त्रकिया असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे. ही शस्त्रक्रिया तब्बल तीन तास चालली. डॉक्टरांच्या पथकाने अथक प्रयत्नांनी १६ सेंटीमीटरची ट्युमरची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली. शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्ण पूर्णपणे ठणठणीत आहे. इतर ठिकाणी या रुग्णाला गाठीसह पूर्ण गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला गेला होता. मात्र, यशराज हॉस्पिटलचे डॉ. नवांगुळ यांनी दुर्बिणीद्वारे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. तसेच रुग्णाचे गर्भाशय वाचवून तिला गरोदरपणाची संधी उपलब्ध झाली आहे. यशराज हॉस्पिटलमध्ये नुकतीच महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली असुन या योजनेमुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासगी रुग्णालयात अशा शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे ८० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, या योजनेमुळे ही शस्त्रक्रिया रुग्णासाठी मोफत झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णांना अशा शस्त्रक्रियेसाठी मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास रुग्णालयाच्या प्रशासनाच्यावतीने डॉ. नवांगुळ यांनी व्यक्त केला आहे. यासाठी त्यांना त्यांच्या टीमने आणि भूलतज्ञ डॉ. मुक्तानंद गवंडळकर यांनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.