गोमय गणेशमूर्ती | मूर्तिकार विलास मळगावकर यांचा अनोखा आदर्श

Edited by: विनायक गांवस
Published on: August 25, 2025 15:31 PM
views 112  views

सावंतवाडी : पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्वत्र केले जात असताना सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील विलास दिगंबर मळगावकर यांनी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. गोमय गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामात ते अथकपणे गुंतलेले आहेत. आता या मूर्तीना रंग देण्याचे काम सुरू आहे. 

त्यांच्या या उपक्रमामुळे इको-फ्रेंडली गणेशोत्सवाला एक नवा आयाम मिळाला आहे. गेल्या ८ वर्षांपासून विलास मळगावकर हे केवळ मातीच्या मूर्ती न बनवता, गोमयाचा वापर करून आकर्षक गणेशमूर्ती तयार करत आहेत. त्यांच्या या मूर्ती टिकाऊ असून विसर्जनानंतर सहजपणे मातीत विरघळतात. यामुळे नदी किंवा तलावांचे प्रदूषण होत नाही. हा उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.