
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांच्या संपाबाबत आज प्रांताधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत प्रांत हेमंत निकम यांनी तोडगा काढला. यानंतर तिनं दिवस सुरू असलेला संप मागे घेण्यात आला. न्याय देण्याचा शब्द मिळाल्याने सावंतवाडी शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी घेत संप मागे घेत असल्याचे सफाई मित्रांनी जाहीर केले.
प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, अभय पंडीत, दीपक सावंत, मनोज घाटकर तसेच न.प. चे अधिकारी वैभव अंधारे, प्रसाद बटवाल, विनोद सावंत, दीपक म्हापसेकर आदींसह कंत्राटी सफाई कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रातांसमोर सफाई मित्रांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. न.प.कडून ठेकेदाराला आमचे मानधन अदा होते. मात्र, १९ हजार मानधन ठरलेले असताना १५ हजार पेमेंट मिळते. ड्रायव्हर, सफाई कामगारांच्या पगारात तफावत दिसते. त्यामुळे आमच्या घामाची उर्वरीत रक्कम जाते कुठे ? असा सवाल केला. तर आम्हाला पगार चिठ्ठी, पगार पावती दिली जात नाही असेही कामगार म्हणाले. तसेच अनेक वर्षाचे कामगारांचे प्रोविडंट फंडचे पैसे देखील दिले जात नसल्याचा आरोप सफाई कामगारांनी केला.
यावेळी प्रांताधिकारी श्री. निकम म्हणाले, कामगाराचे पीएफचे पैसे भरल्या शिवाय कंत्राटदाराशी पुढचे व्यवहार करू नका. तसेच कामगारांचे पीएफचे पैसे बुडविणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले. दरम्यान, नगरपरिषद ३८ सफाई कर्मचाऱ्यांचे नवीन टेंडर आजच काढण्यात येत आहे. जानेवारी पासून नवीन दर ठरवून दिले आहेत. त्यांना मंजूरी मिळावी म्हणून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. नवीन दराप्रमाणे सफाई कामगारांना ७६५ तर ड्रायव्हर ना ९४९ रूपये मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचे घामाचे पैसे बुडणार नाहीत याची दक्षता घ्या, संबंधित ठेकेदाराला बोलावून घेत सर्वांसमक्ष गुरूवारी नगरपरिषद कक्षात बैठक लावण्याच्या सुचना देत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन प्रांताधिकारी श्री. निकम यांनी दिले. त्यांच्या आश्वासनानंतर सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, शहरात पसरलेला कचरा मनाला वेदना देत होता. सणाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचं आंदोलन मागे घेण आवश्यक होतं. यासाठी प्रांताधिकारी यांच्याशी समन्वय साधला. त्यांच्या आश्वासनानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे. तर पीएफ बुडविणाऱ्या ठेकेदाराने पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रांतांनी दिले आहेत. तसेच कामगारांचा घामाचा पैसा कुठे जिरतो ? हे आम्ही बघू, त्यांचा हक्काचा पैसा मिळवून देऊ असा विश्वास श्री. साळगावकर यांनी व्यक्त केला.