
सावंतवाडी : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला असताना सावंतवाडी शहरात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा अनुभव येत आहे. शहरातली बत्ती गुल झाली असुन उत्सवाच्या वेळी कारभार न सुधारल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सावंतवाडी शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. कधी तांत्रिक बिघाड, तर कधी दुरुस्तीच्या नावाखाली तासंतास वीज गायब होते. महत्त्वाच्या सणासुदीच्या काळातही हीच स्थिती असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतरही महावितरण अधिकाऱ्यांचा कारभार काही न सुधारलेला नाही. पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांनी उर्जा विभागाच लक्ष वेधूनही राज्य शासन झोपेचं सोंग घेवून बसलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जर गणेशोत्सवाच्या काळातही अशीच परिस्थिती राहिली, अखंड वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सण-उत्सवाच्या काळात वीज समस्या उद्भवू नये, यासाठी महावितरणने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी जोर धरत आहे.