
सावंतवाडी : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ, स्केटिंग, कराटे या स्पर्धांमध्ये शांतिनिकेतनच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक प्राप्त करत दमदार यश संपादन केले आहे. खेमराज स्कूल बांदा येथे नऊ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षाखालील मुले या वयोगटात इ. ७ वी ची कु. गार्गी किरण सावंत प्रथम आली. तसेच कु. भूमी गुरुदत्त कामत (इ. ९ वी) ही १७ वर्षाखालील मुलींच्या गटात द्वितीय आली. सिंधुदुर्ग नगरी येथे झालेल्या कराटे क्रीडा स्पर्धेत 17 वर्षाखाली मुलींच्या वयोगटात कु. परी मनोज कुमावत (इ. ९ वी) हीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. रोलर स्केटिंग या क्रीडा प्रकाराच्या ओरोस येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलींच्या गटात कु. यज्ञा गजानन तळवणेकर (इ. ४ थी) सावंतवाडी तालुक्यात प्रथम आली. या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेच्या खेळाडूंनी उत्तम यश संपादन केल्यामुळे क्रीडा स्पर्धेतील प्रशालेची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी संचालक विक्रांत सावंत, उपाध्यक्ष नारायण देवरकर, सचिव व्ही.बी.नाईक, सी.ई.ओ बाळासाहेब नंदीहळ्ळी, मुख्याध्यापक समीर परब तसेच संस्था पदाधिकारी शिक्षक व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरावर होणाऱ्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.