
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात निदर्शनास येत असलेल्या मगरीला पकडण्यासाठी आता वनविभागाने 'सापळा ' लावला आहे. त्यामुळे नागरिकांच्या भीतीचा विषय ठरलेली ही मगर आता वनविभागाकडून लावण्यात आलेल्या या सापळ्यात अडकते का ? त्याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
शहरातील मोती तलावात अलीकडे बऱ्याचवेळा मगरीचे दर्शन होऊ लागले आहे. तलावात मगर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्यामुळे याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी वनविभागाच्या जलद कृती दलाकडून तलावात बोटीच्या सहाय्याने पाहणी करण्यात आली होती. मात्र, तलावात कोठेही मगरीचे वास्तव्य आढळून आले नाही. त्यामुळे अखेर शनिवारी वनविभागाच्या जलद कृती दलाकडून मोती तलावात बसविण्यात आलेल्या संगीत कारंजावर मगरीला पकडण्यासाठी एक सापळा बसविण्यात आला. आता या कारंजाच्या ठिकाणी वरचेवर दिसणारी मगर या सापळ्यात कैद होते का त्याबाबत नागरिकांमध्ये कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. गणेशोत्सव तोंडावर असून शहरातील बहुतांश गणपतींचे विसर्जन मोठी तलावात याच ठिकाणी केले जाते. त्यावेळी मोती तलावात अनेक जण पाण्यात खोलवर उतरतात. अशावेळी मगरींपासून कोणाला धोका पोहोचू नये यासाठी वनविभागाकडून ही खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख रामचंद्र उर्फ बबन रेडकर यांनी दिली. ते म्हणाले, शुक्रवारी आम्हाला मोती तलावाच्या संगीतकारं ज्याच्या ठिकाणी मगर असल्याबाबत फोन आला त्यानंतर आम्ही बोटीच्या सहाय्याने संपूर्ण तलावात फिरून पाहणी केली. मात्र कोठेही मगर आढळून आली नाही. त्यामुळे आताही मगर पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला आहे. या सापळ्याद्वारे मगर जरबंद करण्यात येणार असून त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.