
सावंतवाडी : सावंतवाडी रेस्ट हाऊसच्या मागील बाजूस, कठड्यावर खुलेआम गांजा ओढला जात असल्याची धक्कादायक माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. याप्रकरणी पालकमंत्री नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट पोलिसांवर निशाणा साधला आहे. 'गांजा ओढणाऱ्यांपेक्षा विकणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश त्यांनी दिले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री श्री.राणे यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ माफियांचा पर्दाफाश करण्याचे संकेत दिले आहेत. सावंतवाडी रेस्ट हाऊसच्या मागच्या बाजूला असलेल्या कठड्यावर गांजाचे सेवन होते. कठड्यावर गांजा ओढला जातो. सिगारेट आणि पुड्यांमधून गांजाची खुलेआम विक्री होते. गांजा ओढणाऱ्यांपेक्षा गांजा विकणाऱ्यांच्या मागे मी स्वतः लागणार आहे. पोलिसांना अंमली पदार्थ विकणाऱ्या माफियांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचा आरोपही राणे यांनी केला. ३० किलो गांजा जिल्ह्यात आणणाऱ्याला पकडा. तो कोण आहे हे तुम्हाला माहित आहे. तुमच्या चेक पोस्टवरून तो जिल्ह्यात येतोच कसा? असा सवाल करत त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले.