
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या बॅरिस्टर सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडीच्यावतीने रोप्य श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात भक्तीभावात साजरा करण्यात आला.
या आनंद उत्सवासाठी पंढरपूरहुन श्रीमान सहस्त्रनाम प्रभुजी, कृष्ण अर्जुन प्रभुजी यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन होते. गेली पंचवीस वर्ष सावंतवाडी इस्कॉन शाखेचे कार्य अखंडित रित्या चालू आहे. साप्ताहिक सत्संग, अन्नदान, बाल संस्कार वर्ग, नगर संकीर्तन, नगराधिग्राम अभियान, युथ मार्गदर्शन, नगर संकीर्तन, एकादशी कार्यक्रम, हाऊस प्रोग्रॅम, शाळा कॉलेज मध्ये मार्गदर्शन, जेलमध्ये कार्यक्रम, गीता अभ्यास वर्ग, अशा विविध ठिकाणी संस्थेच्या वतीने भगवद्गीता, भागवत या ग्रंथाच्या माध्यमातून समाजामध्ये स्थैर्य, शांती समाधान, भक्ती मार्गाची शिकवण दिली जात आहे. कार्यक्रमाची सुरुवात हरीनामाचा गजर करीत झाली. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे| हरे राम हरे राम राम राम हरे हरे || या मंत्राच्या उच्चारणात राधा कृष्ण यांच्या विग्रहाला अभिषेक घालण्यात आला.
सर्व उपस्थित भाविकांना अभिषेक घालण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. इस्कॉन बेळगावचे श्रीमान माधव चरण प्रभुजी यांनी आपल्या मधुर वाणीने श्रीकृष्ण जन्माष्टमी विषयी विवेचन केले. भक्तीची सर्वांना कशी गरज आहे याविषयी मार्गदर्शन केले. इस्कॉन सावंतवाडीची मुहूर्तमेढ रचणाऱ्या विष्णू लोक प्रभुजी यांच्या मृत्यू अभिवादन करण्यात आले. भगवान राधाकृष्णन यांना सुंदर शृंगार करून 56 प्रकारचे भोग अर्पण करण्यात आले. भगवान श्रीकृष्णांना पाळण्यामध्ये बसवून झुलवण्यात आले. यानंतर इस्कॉन सावंतवाडीच्या बाल संस्कार वर्गाच्या मुलांनी संत जनाबाई ही नाट्य लिला प्रस्तुत केली. याला उपस्थित भक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर महारती करून जोरदार हरिनामाचा गजर करण्यात आला सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन ताल धरला सर्व भाविक भक्त देवाने विसरून नृत्य करू लागले.
यानंतर सर्वांसाठी स्वादिष्ट महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत कक्ष, ग्रंथ स्टॉल, भाग्यवान जीव, बाल संस्कार वर्ग स्टॉल ,असे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते. एकूणच रोप्य महोत्सवी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे नियोजन सुरेख करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातील लोकांनी तन-मन, धना द्वारे सहकार्य केले. कार्यक्रम रचनात्मक सुरेख भक्ती प्रदान करणारा होता. अशा अनेक अभिप्राय भाविक भक्तांनी नोंदविले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली. म्हणून प्रचंड पाऊस असतानाही कार्यक्रम यशस्वी होऊ शकला . इस्कॉनच्या सर्व वरिष्ठ भक्तांचे कृपाशीर्वाद या सोहळ्यासाठी होते.या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व भक्तांचे भाविकांचे नगरातील लोकांचे आभार इस्कॉनच्यावतीने मानण्यात आले.