
सावंतवाडी : देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने विशाल परब यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यांनी यासाठी विनंती देखील केली होती. त्यामुळे यापुढे विशाल परब आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते कोकणात जोमाने पक्ष वाढवण्यासाठी काम करतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. श्री. चव्हाण यांच्या हस्ते विशाल परब यांचे निलंबन रद्द करून घरवापसी झाल्यानंतर ते बोलत होते.
श्री चव्हाण म्हणाले, विशाल परब या युवा नेतृत्वाने विधानसभा निवडणूकीत पर्याय नसल्याने आणि महायुती झाल्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. राज्यात महायुतीत झाल्यामुळे दीपक केसरकर यांना सावंतवाडीची ही जागा सुटली होती. पर्यायाने भाजपसह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते दीपक केसरकर यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यावेळी महायुतीच्या मोठ्या पाठिंब्यावर श्री. केसरकर यांचा विजय झाला होता. विशाल परब यांनी बंडखोरी केली होती. मात्र यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस ह्या नेतृत्वासाठी काम करायची इच्छा आहे. आपल्याला भाजपमध्ये काम करण्याची इच्छा आहे, अशी कित्येकवेळा विनवणी विशाल परब यांनी केली होती. त्यामुळे विशाल परब यांनी केलेल्या या विनंतीवरून त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
यावेळी विशाल परब यांच्या सोबत असंख्य कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी झाली.यावेळी युवा कार्यकर्त्यांसह, महिला युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होते. मुंबई नरिमन पॉइंट परीसर भाजपच्या घोषणांनी दणाणून गेलेला पाहायला मिळाला. यावेळी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रभाकर परब, श्री. परब यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.