
सावंतवाडी : सावंतवाडीहून आजगावकडे जात असताना आजगाव शाळा क्रमांक १ च्या शिक्षिका सृष्टी रविराज पेडणेकर (४८) यांच्या दुचाकीला एका गव्याने जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने सावंतवाडी येथील कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घोडेमुख येथील रस्त्यावर ही घटना घडली. जखमी अवस्थेत असलेल्या पेडणेकर यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आणि त्याच मार्गावरून जाणाऱ्या आरोस हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी त्यांच्या गाडीतून मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे डॉ. अदिती ठाकर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.अधिक उपचारांसाठी त्यांना सावंतवाडीला पाठवण्यात आले. शिक्षक दत्तगुरु कांबळी आणि रुपाली कोरगावकर यांनी त्यांना सावंतवाडीला नेण्यासाठी मदत केली. कॉटेज रुग्णालयात त्यांच्या जखमांवर ड्रेसिंग करून टाके घालण्यात आले आणि नंतर सीटीस्कॅनही करण्यात आले. यावेळी त्यांचे पती रविराज पेडणेकर, म. ल. देसाई, प्रमोद पावसकर, दत्तगुरु कांबळी, रुपाली नाईक, आणि दिनेश चव्हाण यांनी मदतीचा हात दिला.सध्या त्यांच्यावर गोवा येथील मणीपाल रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात गव्यांचा वावर वाढला असून, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि वाहनचालक त्रस्त आहेत. फॉरेस्ट चौकी अगदी जवळ असूनही वन विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.