
सावंतवाडी : शहरातील मिलाग्रीस हायस्कूल प्रशालेमध्ये रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधित रक्षाबंधनाचा सण उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिवशी संस्कृत दिन असल्यामुळे शाळेतील प्रार्थना ही संस्कृत मधून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतून परिपाठ, श्लोक तसेच संस्कृत भाषेचे महत्त्व कथन केले.
यानंतर रक्षाबंधन सण साजरा करताना सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदाना यांना शालेय मंत्रिमंडळातील कुमारी हर्षिता देवरुखकर या विद्यार्थिनीने राखी बांधून या सणाचा शुभारंभ केला. तसेच इंग्रजी प्रायमरी, मराठी प्रायमरी व हायस्कूल विभागातून प्रत्येक वर्गातून प्राथमिक स्वरूपात एक भाऊ व एक बहीण या सर्वांना एकत्रित स्टेजवर घेऊन रक्षाबंधनाचा आनंदमय कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर स्काऊट गाईड विषय अंतर्गत स्काऊट गाईडच्या सर्व विद्यार्थिनींनी शालेय वाहन व रिक्षा चालक यांना शालेय सभागृहामध्ये एकत्रित करून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या .तसेच या दिवसाचे महत्त्व विचारात घेता शाळेमध्ये राखी बनविणे व 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणाची पार्श्वभूमी विचारात घेता तिरंगा रंगातील विविध फुले बनविणे अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या उपक्रमांतर्गत निवडक काही राख्या व फुलांचे प्रदर्शन शाळेमध्ये आयोजित करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रे .फादर रिचर्ड सालदाना ,पर्यवेक्षिका सध्या मुणगेकर , मराठी प्राइमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी, इंग्लिश प्राइमरी पर्यवेक्षिका सौ.क्लिटा परेरा आधी उपस्थित होते. यावेळी रक्षाबंधन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . क्लाऊडिया बारदेस्कर व फ्लोरिंडा फर्नांडिस यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.