
सावंतवाडी : जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी मासिक मानधन वाढीच्या मागणीसाठी येत्या स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत त्यांचे निश्चित मानधन मिळत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी नाही
ग्रामरोजगार सहाय्यकांनी उपविभागीय अधिकारी (रोहयो) यांना दिलेल्या निवेदनानुसार, ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार त्यांचे मासिक मानधन ८,००० रुपये आणि इतर खर्च २,००० रुपये असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, हा निर्णय अद्याप लागू न झाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेश चतुर्थीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर असतानाही मानधनाअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. ग्रामरोजगार सहाय्यकांनी सांगितले की, मानधन न मिळाल्याने त्यांना मुलांचे शिक्षण, आजारपण आणि घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. या आर्थिक आणि मानसिक ताणामुळे काही ग्रामरोजगार सेवकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाबही त्यांनी निदर्शनास आणली. त्यामुळे, १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी थकीत मानधन मिळावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
जर या मागणीकडे दुर्लक्ष झाले, तर १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले जाईल आणि त्यानंतर निश्चित मानधन मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील, असा इशारा ग्रामरोजगार सहाय्यकांनी दिला आहे.