कारिवडे ग्रामस्‍थांचे स्‍वातंत्र्यदिनी आमरण उपोषण

वैद्यकीय असुविधेने घेतला युवकाचा बळी : जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन
Edited by:
Published on: August 09, 2025 21:05 PM
views 124  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्‍हा रुग्‍णालय मृत्‍यूशय्‍येवर असून वैद्यकीय सुविधांअभावी अनेकांना उपचारांअभावी प्राण गमवावे लागत आहेत. कारिवडे येथील युवक परशुराम पोखरे याचा अपघात झाल्‍यानंतर योग्‍य उपचार न मिळाल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला. या कुचकामी वैद्यकीय सेवेच्‍या निषेधार्थ आणि वैद्यकीय सेवा पुरविण्‍यात शासन आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरले, याबाबत संबंधितांना जाग आणण्‍यासाठी १५ ऑगस्‍ट रोजी कारिवडे ग्रामस्‍थांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्‍हाधिकार्‍यांना कारिवडे ग्रामस्‍थांनी सादर केले. 

३ ऑगस्‍ट रोजी कारिवडे, डंगवाडी येथील युवक परशुराम प्रकाश पोखरे या युवकाचा चराठा याठिकाणी अपघात झाला होता. त्‍याला उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्‍टर उपलब्‍ध नव्‍हते, रुग्‍णवाहिका उपलब्‍ध नव्‍हते, साधे प्रथमोपचार देखील मिळत नव्‍हते, त्‍यामुळे रक्‍तस्‍त्राव होत असलेला रुग्‍ण अक्षरश: तडफडत होता. दोन तासानंतर त्‍याला बांबोळीत हलविण्‍यात आले, मात्र वाटेतच त्‍याचा मृत्‍यू झाला. अशी परिस्‍थिती इतर तरुणांवर ओढवू नये, यासाठी शासन आणि लोकप्रतिनिधींना जाग आणण्‍यासाठी कारिवडे ग्रामस्‍थांनी आक्रमक पावित्रा घेत १५ ऑगस्‍ट रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. सावंतवाडीत मल्‍टीस्‍पेशालिस्‍ट इस्‍पितळ व्‍हावे, तसेच उपजिल्‍हा रुग्‍णालयात तातडीने सुविधा पुरवाव्‍यात, अशी मागणीही या निवेदनातून करण्‍यात आली आहे. या निवेदनाच्‍या प्रती पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकर, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांनाही सादर करण्‍यात आल्‍या आहेत.