माडखोल ग्रामस्थांचे जोडे मारो आंदोलन स्थगित

Edited by: विनायक गांवस
Published on: August 07, 2025 10:55 AM
views 72  views

सावंतवाडी : माडखोल गावातील विविध विज समस्याबाबत माडखोल ग्रामस्थांनी सावंतवाडी कार्यालयासमोर उपअभियंत्यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारून जोडे मारो आंदोलन छेडताच महावितरणने दोन दिवसांपासुन गावातील विविध समस्या सोडविण्यास प्रारंभ केला. तसेच उपअभियंता शैलेंद्र राक्षे यांनी सोमवारी रात्री गावात जात ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी  विज समस्या सोडवण्यासह वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिल्यामुळे माडखोल ग्रामस्थानी पुकारलेले जोडे मारो आंदोलन स्थगित केले.

माडखोल गावातील विविध विजेच्या समस्याबाबत गेल्या चार महिन्यांपासून जैसे थे स्थिती असुन याबाबत महावितरणचे अनेकवेळा लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही केली नसल्याच्या निषेधार्थ माडखोल ग्रामस्थांनी जोडे मारो आंदोलनाचा इशारा दिला होता. महावितरणने याची तात्काळ दखल घेत दोन दिवसांपासून गावातील विजपुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात केली. तसेच उपअभियंता शैलेंद्र राक्षे यानी आपले इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सोमवारी रात्री माडखोल गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे ग्रामस्थानी मंगळवारचे जोडे मारो आंदोलन स्थगित केले. यावेळी माडखोल उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ, माडखोल गाव विकास संघटनेचे दत्ताराम राऊळ, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, बंटी सावंत, अविनाश राऊळ, दशरथ राऊळ, सहदेव राणे, संदेश राऊळ, कृष्णा राऊळ, आत्माराम राऊळ, अनंत राऊळ, प्रसाद राऊळ, रोहित राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.