
सावंतवाडी : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तपासाबाबत चुकीची माहिती देण्याऱ्या कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत सावंतवाडी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
कुडाळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या दैनंदिनीबाबत आपण माहिती मागितली होती. त्यानंतर या मागणीसाठी मुख्यालयात बेमुदत उपोषण केले होते. संबंधित माहिती व चौकशी करण्यात आली असून त्याची प्रत उपविभागीय अधिकारी कार्यालय सावंतवाडीत पाठविण्यात आली असा शेरा मारण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात ती माहिती पाठवण्यात आलेली नाही.
सर्व प्रकार म्हणजे पोलीस निरीक्षक मगदूम यांच्याकडून व त्यांचे सहकारी गणेश कराडकर यांच्याकडून उपविभागीय पोलीस कार्यालयाची फसवणूक झाल्यासारखे आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत श्री. बरेगार यांनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा दिला आहे.