सावंतवाडीत तीन दिवसीय नाट्यमहोत्सव

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य
Edited by:
Published on: March 12, 2025 12:27 PM
views 115  views

सावंतवाडी : सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १७ मार्च असा तीन दिवसीय नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या महोत्सवात ट्रीकसिनयुक्त दोन दशावतारी नाट्यप्रयोग तर एक ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे. शहरातील भोसले उद्यान समोर हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी येथे दिली.  

यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, तालुका अध्यक्ष रवींद्र मडगावकर, प्रल्हाद तावडे, नंदू शिरोडकर, प्रताप परब, मोहिनी मडगावकर, विनोद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, आ. राणे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यात  १५ मार्च ते १७ मार्च या तीन दिवसात हे विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये गरजू लोकांना धान्यवाटप, रुग्णांना फळ व औषध वाटप तसेच हॉस्पिटलमध्ये बेडशीट वाटप आदी विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत. या शिवाय दररोज सायंकाळी सात वाजता शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले स्मृति उद्यान येथे नाट्यप्रयोग होणार आहेत. 

यामध्ये १५ मार्च रोजी कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा 'जय जय रवळनाथ ' हा ट्रीकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. तर १६ मार्चला जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ यांचा ट्रीकसिनयुक्त 'कृष्णभक्त कुुम्मनदास ' हा नाट्य प्रयोग तसेच १७ मार्च रोजी गणेश ठाकूर दिग्दर्शित अफजलखानाच्या वधावर आधारित रोमहर्षक ऐतिहासिक नाट्य कलाकृती 'नरसिंहशिवराय' नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या विविध कार्यक्रमांचा व नाट्यपुष्पांचा नाट्य रसिकांनी व नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.