कलंबिस्त ते सावरवाड मार्गावरील रस्त्याचे काम लवकरच करण्याचं आश्वासन

उपोषण मागे
Edited by:
Published on: February 18, 2025 13:17 PM
views 149  views

सावंतवाडी : कलंबिस्त ते सावरवाड मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण व कार्पेटचे काम येत्या २१ फेब्रुवारीपर्यंत हाती घेतले जाईल. या रस्त्याचे चांगले दर्जाचे काम निश्चितपणे संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्याची ग्वाही शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय कदम व सामाजिक कार्यकर्ते सुनील सावंत, रवींद्र तावडे, प्रथमेश सावंत, प्रल्हाद तावडे यांनी पुकारलेले उपोषण तुर्त मागे घेण्यात आले. 

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी आरोग्य सभापती ॲड.परिमल नाईक हे उपस्थित होते. कलंबिस्त ते सावरवाड रस्त्याचे डांबरीकरण व कार्पेटचे काम अर्धवट स्थिती ठेवण्यात आले होते. १५ फेब्रुवारी पर्यंत हे काम करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यानी दिली होती पण ठेकेदाराने काम हातीच घेतले नव्हते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर विजय कदम व गावातील युवकांनी उपोषण सुरू केले. संध्याकाळी उशिरापर्यंत अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची मनधारणा केली. परंतु उपोषणकर्ते आपल्या मताशी ठाम होते. अखेर रात्री नऊ वाजता शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग हेही उपस्थित होते. रस्ता निश्चितपणे डांबरीकरण करून घेण्याचे हमी आपण देत असल्याचे श्री. परब यांनी स्पष्ट केले. यावेळी सचिन सावंत सुनील सावंत किरण सावंत निलेश पास्ते, सुशील राजगे. राजेश पास्ते राजेश सावंत रघुनाथ सावंत रवींद्र तावडे आधी उपस्थित होते. या उपोषणाला कलंबिस्त सरपंच सपना सावंत उपसरपंच सुरेश पास्ते शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ उपसरपंच सचिन धोंड, बाबा पास्ते, संदेश बिडये. राजू बिडये अंतोन रोड्रिक्स श्री फर्नांडिस आदी उपस्थित होते.