
सावंतवाडी : स्वच्छ, सुंदर सावंतवाडीच्या टिमक्यात मिरवणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेनं शहराला अक्षरशः 'धुळीत' घातलं आहे. बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराला शिक्षा देण्याऐवजी सावंतवाडीकरांनाच 'हवा प्रदुषणा'ची शिक्षा भोगावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नगरपरिषद मुख्याधिकारी आणि ठेकेदारावर प्रशासकीय कारभार हाकणारे प्रांताधिकारी कोणती ऍक्शन घेणार ? अन् शहराला प्रदुषण मुक्त कसं करणार असा सवाल सावंतवाडीकर जनता विचारत आहेत.
बोगस काम करुन रस्ता खराब झाल्याने नागरिकांच्या जन आक्रोशास प्रशासनाला सामोरं जावं लागल होत. यानंतर भानावर आलेल्या प्रशासनान अन् ठेकेदारान पुन्हा एकदा धुळफेकीचा प्रकार केला. संपूर्ण बाजारपेठ धुळीत मिळवल्यानंतर आता शहरही धुळीत घातलं गेलं आहे. हक्काचे सेवक पालिकेत नसल्यानं नागरिकांना वाली उरले नाहीत. त्यात आता गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले चर ठीक करताना बोगस काम करत धुळीच साम्राज्य पसरवण्याच काम केलं गेलं आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताला खूल आमंत्रण मिळत असून वायू प्रदूषणामुळे नागरिकांच आरोग्य धोक्यात आलं आहे. धुळीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. एरवी नागरिकांकडून दंड वसूली करणार, स्वच्छता, पर्यावरणावर तत्वज्ञान देणारे नगरपरिषद अधिकारी आता कुठे झोपी गेलेत ? असा सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मुख्याधिकारी व ठेकेदारावर प्रशासकीय कारभार हाकणारे प्रांताधिकारी हेमंत निकम कोणती ऍक्शन होणार ? असा सवाल सावंतवाडीकर विचारत आहे.