सावंतवाडी : शहरातील सालईवाडा येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. तर एक किरकोळ जखमी झाला. ओंकार विजय पांढरे ( २४, रा. कोनापाल, निरवडे ) व बाबुराव नाईक ( २५, रा. कोलगांव ) अशी त्यांची नावे आहेत. तर उदय शांताराम रेडकर (४०, रा. तळवडे ) हे किरकोळ जखमी झाले. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातानंतर रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध न झाल्याने पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर हे आपल्या दुचाकीने गंभीर जखमी ओंकार पांढरे याला घेऊन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आले. तर इतर जखमीनाही खासगी वाहनाने रुग्णालयात आणण्यात आले. यातील ओंकार पांढरे व बाबुराव पाटील या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही तत्काळ अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले. दरम्यान, हलगर्जीपणे व अविचाराने वाहन चालवून तिघांच्या दुखापतीस व दोन वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरले प्रकरणी यातील ओंकार विजय पांढरे याच्यावर सावंतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर, आबा पिळणकर, संजय कोरगावकर, संतोष गलोले यांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मदत कार्यात देखील सहभाग घेतला होता.