
सावंतवाडी : तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यामध्ये एका गावात दोन दिवसापूर्वी शिकारीसाठी गेलेल्या तिघांपैकी एकाच्या पायाला बंदुकीचा शेरा लागून गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित तरुणावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू असून हा प्रकार गुप्त ठेवण्यात आला. मात्र, या संदर्भात सावंतवाडी पोलिसांनीही खात्री केली असता संबंधित तरुण पडून जखमी झाल्याचा बनाव संबंधितांकडून करण्यात आल्याचे समोर आलं आहे.
गावातील तिघे तरुण दोन दिवसांपूर्वी सह्याद्री पट्ट्यातील एका जंगलात शिकारीसाठी गेले होते. यावेळी एकाच्या हातातील बंदुकीचा शेरा पाठीमागील एकाच्या पायाला लागला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले. त्याच्यावर बांबोळी येथे उपचार सुरू असून या घटनेची गुप्तता पाळण्यात आली आहे. आपल्या कानावरही ही घटना आली आहे. पोलीस पाटीलांनी घटनेची चौकशी केली. मात्र, संबंधित तरुण हा पडून जखमी झाल्याचे काहींनी सांगितले. खातरजमासाठी बांबोळी मेडिकल कॉलेजच्या रिपोर्ट आपण पाहणार आहे. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले आहे.