सावंतवाडी अर्बनच्या संचालकांचा सन्मान

Edited by:
Published on: May 13, 2025 15:49 PM
views 57  views

सावंतवाडी : ७८ वर्षे यशस्वी वाटचाल केलेल्या सावंतवाडी अर्बन सहकारी बँकेचे लवकरच ठाणे जनता सहकारी बँकेत विलीनीकरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर, ठाणे जनता सहकारी बँकेच्या वतीने सावंतवाडी अर्बन बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा आणि कार्यकारणी सदस्यांचा आज सकाळी सन्मान करण्यात आला.

माई इन्स्टिट्यूट, मळगाव येथील सभागृहात आयोजित या सत्कार समारंभात सावंतवाडी अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि पत्रकार नरेंद्र देशपांडे यांच्यासह अध्यक्ष ऍड. सुभाष पणदूरकर, उपाध्यक्ष रमेश बोंद्रे, संचालक गोविंद बाळा वाडकर, रमेश पै, मृणालिनी कशाळीकर, उमाकांत वारंग, वाय. पी. नाईक, श्री. बोवलेकर आणि सौ. कोठावळे यांचा शाल, श्रीफळ, समई आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला ठाणे जनता सहकारी बँक तथा डीजे एस बी चे अध्यक्ष शरद गांगल यांच्यासह माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर, उपाध्यक्ष वैभव सिंगवी आणि इतर महत्त्वपूर्ण बँक अधिकारी उपस्थित होते. सावंतवाडी येथे ठाणे जनता सहकारी बँकेच्या १५० व्या शाखेचा उद्घाटन सोहळा लवकरच पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीच्या पूर्वसंध्येला सावंतवाडी अर्बन बँकेच्या संचालकांचा हा सत्कार दोन्ही बँकांमधील सौहार्दपूर्ण संबंधांचे प्रतीक ठरला.