सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेची सावंतवाडी तालुका बैठक 26 ऑगस्टला

Edited by: विनायक गावस
Published on: August 24, 2023 16:40 PM
views 107  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांना वीजेसंदर्भात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यांचे निवारण करण्यासाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची पूर्वनियोजित बैठक शनिवार दि. 26 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षाच्या शेजारील हॉलमध्ये (बॅ. नाथ पै नाट्यगृह प्रवेशद्वार समोर) घेण्यात येणार आहे. 

     शनिवारी होणारी बैठक वीज ग्राहक संघटना जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी सदस्य तसेच महावितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत होणार आहे. गणेशोत्सव सण जवळ येत असल्याने लोकांना वीजेच्या समस्या उद्भवू नयेत आणि निर्विघ्नपणे गणेशोत्सव पार पडावा यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांना निमंत्रित करण्यात येत असून ज्यांच्या महावितरणच्या वीज वितरण बाबत काही समस्या असतील, जुन्या तक्रारी असतील तर लेखी स्वरूपात तक्रार अर्ज, जुन्या तक्रारींच्या झेरॉक्स प्रती, इतर कागदपत्रे, पत्रव्यवहार आदी सोबत आणणे आवश्यक आहे. जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या अंतर्गत सावंतवाडी वीज ग्राहक संघटना सर्व तक्रारींचे योग्य पद्धतीने निरसन करण्याचा प्रयत्न करणार. सावंतवाडी वीज ग्राहक आणि महावितरण सर्व अधिकारी वर्ग असा एकत्र व्हॉट्सॲप समूह बनवून यापुढे एकदिलाने काम करण्याचे ठरविले असून तसे नियोजन करण्यात येणार आहे.

    यावेळी सावंतवाडी तालुक्याची उर्वरित कार्यकारिणी गठित करण्यात येणार असून समाजसेवा म्हणून तालुका तसेच जिल्हा कार्यकारिणी मध्ये कोणाला काम करण्याची इच्छा असेल त्यांनी स्वखुशीने बैठकीसाठी यावे अन् संघटनेमध्ये सामील व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग यांनी केले आहे.