उपजिल्हा रुग्णालयाची बदनामी नको ! | पण,जनतेचे हालही नकोत : ॲड. अनिल निरवडेकर

जनसहयोगासाठी सामाजिक संस्थांना आवाहन
Edited by:
Published on: October 16, 2025 22:05 PM
views 71  views

​सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांवरून सावंतवाडीतील वातावरण तापले आहे. यात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जनसहयोग आणि सकारात्मक कृतीतून मार्ग काढण्याची महत्त्वपूर्ण दिशा दिली आहे. रुग्णालयाच्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्यानंतर, तातडीने बैठक घेऊन आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी सक्रिय मदतीचा हात पुढे केला असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते ॲड. अनिल निरवडेकर यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, ​राज्याची जबाबदारी असतानाही, सावंतवाडीचे भूमीपुत्र असलेले रवींद्र चव्हाण यांचे आपल्या तालुक्याकडे आजही तेवढेच लक्ष आहे. त्यांनी कोणतीही राजकीय टीका न करता, जनतेसह सर्वांच्या सहकार्यातून सावंतवाडीच्या आरोग्य क्षेत्रातील विकासासाठी निर्णायक यंत्रणा उभी करण्याची भूमिका घेतली. कोणत्याही प्रकारे राजकारणासाठी राजकारण न करता, कोणावरही राजकीय टीकाटिपणी न करता जनतेसह सर्वांच्या सहयोगातून सावंतवाडीच्या आरोग्य क्षेत्रातील विकासासाठी निर्णायक ठरणारी यंत्रणा उभी करा, मी तुमच्यासोबत आहे असा शब्द दिल्याचे सांगितले.

​​रुग्णालयाच्या बदनामीऐवजी तिथे कार्यरत डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण समजून घेणे महत्त्वाचे आहे. सध्या येथे २० डॉक्टरांची गरज असताना केवळ ५ डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि नर्सेसची संख्याही तुटपुंजी आहे. तरीही ते अहर्निश सेवा देत आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून २०२४ मध्ये उपलब्ध झालेल्या या मशीनचा लाभ आतापर्यंत ८६१६ रुग्णांना झाला आहे. रुग्णालयात १० बेडसचा मोठा आयसीयू कक्ष, २ एक्स-रे मशीन्स, आणि १ पोर्टेबल एक्स-रे मशीन आहे. दररोज २०० पेक्षा जास्त रक्त नमुन्यांची तपासणी आणि तीनशे ते साडेतीनशे रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया येथे होत आहेत. ​रुग्णालयाला तातडीने एका फिजिशियन डॉक्टरांची सर्वाधिक गरज आहे. शासनाकडून लगेच आर्थिक तरतूद शक्य नसल्याने, रवींद्र चव्हाण यांनी जनसहयोग आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने निधी उभारण्याची संकल्पना मांडली.

​या निधीतून खाजगीरित्या फिजिशियनची नेमणूक करणे आणि मदतीसाठी नर्सेस उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

 रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतः आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनीही या उपक्रमासाठी मोलाची साथ दिली आहे. मी स्वतः ही हातभार लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​तसेच उभारलेल्या निधीतून फिजिशियनचे किमान एक वर्षाचे मानधन देणे शक्य होणार आहे "स्वतःपासून सुरुवात करा" हा मंत्र रवींद्र चव्हाण यांनी दिला असून, 'सबका साथ सबका विकास' हे ध्येय कृतीतून सिद्ध केले आहे. या उपक्रमाला सामाजिक संस्था, संघटना आणि तमाम सावंतवाडीकरांची इच्छाशक्ती उभी राहिल्यास, उपचाराअभावी कोणालाही दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वास ॲड. निरवडेकर यांनी व्यक्त केला आहे. नव्या 'विकास पर्वाच्या' यशस्वीतेसाठी समाजातील आणखी दानशूर व्यक्तींनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केलं आहे