सावंतवाडी रेल्वेस्थानकात उद्या लाक्षणिक उपोषण !

मोठ्या संख्येने सहभागी व्हा : अँड. निंबाळकर
Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 09:29 AM
views 202  views

सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे. याप्रसंगी सावंतवाडीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात सहभागी व्हावं असं आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर यांनी केल आहे.

ते म्हणाले, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस मंजूर झाले असून दोन टप्प्यांमध्ये या टर्मिनसचा विकास होणार होता. पहिल्या टप्प्याचा निधी या ठिकाणी खर्च करण्यात आला. तर दुसऱ्या टप्प्याचा निधी परत घेण्यात आला. तो देऊन टर्मिनस जलद गतीने हे काम व्हावे अशी आमची मागणी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या टर्मिनसचे आठ वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले होते.  प्रवाशांची गैरसोय होत आहे हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्रमुख स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशीही आमची मागणी आहे. कोकण रेल्वेच्या प्रमुखांनी आंदोलनाची दखल घेतली असली तरी मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नसल्याने आंदोलन हे निश्चित आहे. तसेच टर्मिनसच्या नामकरणाबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष घातले होते. आता त्यांनी प्रा. मधु दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी टर्मिनसचे नामकरण करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये ठराव घ्यावा अशी देखील मागणी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी  प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, महेश परूळेकर, अभिमन्यू लोंढे, सागर तळवडेकर, भुषण बांदिवडेकर, तेजस पोयेकर, विनायक गांवस आदी उपस्थित होते.