
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील वूडन कॉटेजीसनचा टर्मिनसशी कोणताही संबंध नसून त्याला आमचा विरोध असून दीपक केसरकर हे त्यांनी केलेल्या राजकीय तडजोडीसाठी सावंतवाडी टर्मिनसचा बळी देत आहेत का ? असा सवाल कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर यांनी केला. तसेच खासदार नारायण राणे सावंतवाडी टर्मिनससाठी सकारात्मक आहे. यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, आम्ही त्यांचे ऋणी राहू असे मत अँड. निंबाळकर यांनी व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अँड निंबाळकर म्हणाले, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ऑफीस आणि रेलोटेल हॉटेल होणार होतं. मात्र, त्या ठिकाणी वूडन कॉटेजीस, सरकते जीने आणि निवारा शेड होणार असल्याचे समोर आले आहे. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना तेथे मोठ हॉटेल होणार होतं. मात्र, हा प्रकल्प रद्द झाला. कोकण रेल्वेकडे पैसे नसल्याने राज्य सरकारने सिंधुरत्न योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याचा पर्याय दिला होता. तिथे ऑफिस आणि हॉटेल होणार होत. टर्मिनसच्या हिताची गोष्ट असल्याने आम्ही त्याला पाठिंबा दिला. मात्र, आता येथे ५० वूडन कॉटेजीस, सरकते जिने आणि निवारा शेडबाबत घोषणा केली गेली. वूडन कॉटेजीस सावंतवाडी टर्मिनसशी कोणताही संबंध नसून त्याला आमचा विरोध आहे असे मत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, राज्यकर्त्यांना कंत्राट काढून काम करण्यात अधिक स्वारस्य आहे. या गोष्टींचा जनतेला कोणताही उपयोग होत नाही. सावंतवाडीतल हेल्थ पार्क, रघुनाथ मार्केटच उदाहरण समोर आहे. वुडन शेड करून केवळ शासनाचे पैसे खर्च होणार आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. टर्मिनसच्या कामात याचा कोणताही फायदा नाही. त्यामुळे आमदार दीपक केसरकर त्यांनी केलेल्या राजकीय तडजोडीसाठी सावंतवाडी टर्मिनसचा बळी देत आहेत का ? असा सवाल अँड. निंबाळकर यांनी केला.
तसेच खासदार नारायण राणे सावंतवाडी टर्मिनससाठी सकारात्मक होते. आंदोलनावेळी आम्हाला त्यांनी सकारात्मकता दर्शविली. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनसचा सकारात्मक विचार करावा. सावंतवाडी शहरावर सर्वच दळणवळणाच्या क्षेत्रात अन्याय होत आहे. त्यामुळे खा. राणेंनी सावंतवाडी टर्मिनसाठी प्रयत्न करावे. आम्ही त्यांचे ऋणी राहू असे मत अँड . निंबाळकर यांनी व्यक्त केले. यावेळी संघटनेचे सचिव मिहीर मठकर, उपाध्यक्ष सागर तळवडेकर, नंदू तारी, अँड. सायली दुभाषी, संजय लाड आदी उपस्थित होते