
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम पुर्णत्वास आले आहे. यामुळे या रेल्वे स्थानकाला आता नवा लुक प्राप्त झाला आहे. यामुळे कोकणच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून यासाठी ६ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिला होता.
रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी २३ कोटी रूपये निधी मंजुर करून दिला होता. यात सावंतवाडीसाठी ६ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात आली होती. या कामांचे ऑनलाईन भुमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत,गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदी उपस्थित होते.
स्थानकाला एयरपोर्टचा लूक !
सावंतवाडी रोड स्थानकाच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, फुटपाथ, आर सी सी गटर, संरक्षक भिंत, प्रवेश द्वार कमान, बस थांबा, रिक्षा थांबा, बागकाम व इतर सुशोभीकरण आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ६ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यामुळे आता सावंतवाडी रेल्वे स्थानकाच रूपडे पालटले आहे. रेल्वे स्थानकावरील सुशोभीकरणामुले एयरपोर्टचा लूक आला आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसह चाकरमान्यांसाठी हे खास आकर्षण ठरणार आहे. स्थानकाला आलेली नवी झळकली निश्चितच मनाला भुरळ घालणारी आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष आभार सावंतवाडीकरांनी मानले आहेत.
प्रा.मधू दंडवतेंच्या नावाची मागणी !
दरम्यान, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांच नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना या ठिकाणी थांबा देण्यात यावा व रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शासनाकडे केला आहे. तर सुशोभीकरणासाठी सरकारला धन्यवाद दिले आहे.