सावंतवाडी रेल्वे स्थानक सामूहिक बलात्कार केस ; आरोपींची निर्दोष मुक्तता

आरोपीतर्फे अॅड विवेक मांडकुलकर - अॅड संग्राम देसाई यांचा युक्तिवाद
Edited by: भरत केसरकर
Published on: March 30, 2024 13:27 PM
views 1872  views

कुडाळ : ओरोस येथील मे. विशेष न्यायाधीश सौ. एस. एस. जोशी यांनी अल्पावयीन मुलीस जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध केल्याच्या आरोपातून आरोपी रामचंद्र अंकुश घाडी, रा. आकेरी, राकेश कृष्णा राऊळ, प्रशांत कृष्णा दोघेही रा. मळगाव यांची सबळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपी क्र १ तर्फे अॅड विवेक मांडकुलकर, अॅड.प्रणाली मोरे, अॅड भुवनेश प्रभुखानोलकर आणि आरोपी क्र २ व ३ तर्फे अॅड संग्राम देसाई, अॅड अविनाश परब, अॅड सुहास साटम यांनी काम पहिले. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक २१/०९/२०१८ रोजी फिर्यादी अल्पवयीन मुलीस आरोपी क्र.१ याने तिचा बॉयफ्रेंड आहे हे तिच्या घरच्याना सांगेन अशी धमकी देऊन तिला घरी  सोडतो असे सांगून जबरदस्तीने मळगाव रेल्वेस्टेशन जवळील अनय लॉजवर नेऊन पाणी प्यायला देऊन तिला गुंगी आल्यावर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले तसेच तिला लॉजवरुन बाहेर पडल्यानंतर रेल्वेस्टेशनजवळ उभ्या असणाऱ्या आरोपी क्र.२ व ३ यांजकडून आरोपी क्र१ याने ५० रुपये घेऊन फिर्यादीस त्यांच्या ताब्यात दिले. फिर्यादीने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला असता आरोपी क्र २ व ३ यांनी तिला पाणी प्यायला दिले व तिला गुंगी आल्यावर जबरदस्तीने रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वरील शेडवर नेले व त्या दोघांनी देखील शारीरिक संबंध ठेवले अशी फिर्याद सावंतवाडी पोलीस ठाणे येथे देण्यात आली होती.

त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती. सदर केसचे कामी सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले होते. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व आरोपी तर्फे अॅड विवेक मांडकुलकर व अॅड संग्राम देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मे. विशेष न्यायाधीश सौ. एस. एस. जोशी यांनी सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.