
सावंतवाडी : सुशोभीकरण म्हणजे एखाद्या वस्तु वा वास्तुचे स्वरूप सुधारण्याची प्रक्रिया असे साधारण म्हंटले जाते. आता याचा अर्थ राज्य सरकारला कळला नाही की कोकण रेल्वे प्रशासनाला ? हा प्रश्न सावंतवाडीकरांना पडला आहे. त्याच कारण ठरलं आहे ते सावंतवाडीच रेल्वे स्टेशन. येथील सुशोभीकरणच अंधारात हरवल्याच चित्र रेल्वे स्थानकावर पहायला मिळत आहे. सायंकाळनंतर स्थानक दिसेनासच होतय. कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून कोकणातील रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात आला. कोट्यवधी रुपये खर्च करून या थांब्यांचा कायापालट करण्यात आला. त्यामुळे ही रेल्वे स्टेशन चक्क विमानतळासारखी दिसू लागली. मात्र, सायंकाळनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील लाईट मालविल्या जात आहेत. त्यामुळे शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून तयार केलेलं हे सुशोभीकरण अंधारात जात आहे. कमी केलेल्या रेल्वे व येथे थांबणाऱ्या कमी गाड्या हेच यामागचे मुख्य कारण आहे. त्यामुळे रेल्वे टर्मिनस म्हणून ज्यात भूमिपूजन केले गेले ते सावंतवाडी स्थानक अंधारात चाचपडत आहे ही एक शोकांतिका आहे. तर कोट्यवधीचा खर्च हा याजसाठी केला होता का ? असाही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे.
याविषयी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे संपर्क प्रमुख भुषण बांदिवडेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, अशाच अंधाराचा फायदा घेत 2018 ला सावंतवाडी स्थानक अर्थात रेल्वे टर्मिनस येथे बलात्कारासारखी दुदैवी घटना घडली होती. त्याच बरोबर अपघाताचाही घटना घडल्यात. सुशोभीकरणावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, तिथे जर आता विद्युत सेवा नसेल तर त्या शुसोभिकरणाचा उपयोग तरी काय ? ही अशी नागरी सुविधेची व्यवस्था सावंतवाडी टर्मिनस वर करून दिल्या बद्दल नागरिकांनी कोणाचे आभार मानावेत ? स्थानिक आमदार, पालकमंत्री आणि खासदारांचे की कोकण रेल्वे अधिकाऱ्यांचे असा खोचक सवाल श्री. बांदिवडेकर यांनी केला.