
सावंतवाडी : जागतिक महिला दिनानिमित्त सावंवाडीतील नगरपालिका महिला कर्मचारी व महिला सफाई कामगार भगिनी यांचा जाहीर सत्कार सोहळा मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांच्या माध्यमातून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सावंतवाडी शहवासियांना नियोजनपूर्वक सेवा सहकार्य देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असलेल्या नगरपालिका महिला कर्मचारी व सफाई कामगार भगिनी यांचे समाजोपयोगी कार्य हे सावंवाडीतील जनतेला अतिशय प्रेरणादायक ठरत आहे. शहरामध्ये जनजागृती करणे, शहरवासियांचे तसेच संगणीकृत कागदपत्रांचे काम, बाजार मंडईमधील स्वच्छता अभियान अशा अनेक योजना राबविण्यात सदर महिला कर्मचारी भगिनी नेहमीच आपले कार्य पूर्ण जबाबदारीने पार पाडत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सोळा महिला कर्मचारी व चार सफाई कामगार भगिनी यांचा सत्कार महिला जिल्हाध्यक्ष नीलम गवस, जरीना शेख, सानिया शेख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देवून गौरविण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आपले विचार मांडले. नगरपालिका महिला कर्मचारी परवीन शेख यांनीही महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन, सिंधुदुर्ग जिल्हा महिलाध्यक्ष नीलम गवस यांनीही जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचारी भगिनी यांना महिलांचे हक्क व समाजातील उद्भवणाऱ्या समस्या यांबाबत मार्गदर्शन केले. प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी महिला सफाई कामगार भगिनी यांना एका वर्षासाठी आरोग्य सेवा विमा पॉलिसी मानवाधिकार संघटनेमार्फत देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
सदर सत्कार सोहळा प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीतर्फे जिल्हाध्यक्ष रिजवान बाडीवाले, युवक जिल्हाध्यक्ष संजय गावडे, वरिष्ठ जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पारधी, सरचिटणीस रमीझ मुल्ला, मीडिया प्रमुख आबिद कित्तुर्, तालुका प्रमुख अनंत सोन्सुरकर, उपतालुका प्रमुख शाहबाज शेख, प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर, महिला जिल्हाध्यक्ष नीलम गवस, उपजिल्हाध्यक्ष सानिया शेख, सरचिटणीस जरीना शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.