
सावंतवाडी : मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडी शहरातच व्हावे ही राजघराण्याची सुरुवातीपासूनच इच्छा आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक जमिनीबाबत शासनासोबत आतापर्यंत तब्बल दोन वेळा समझोता करार झाला असून दोन्ही वेळा जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले आणि राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या सह्या झाल्या आहेत. कराराप्रमाणे आता जी अन्य एका व्यक्तीची सही राहिली आहे ती घेण्याची जबाबदारी शासनाची आहे. येत्या दोन महिन्यात त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. अन्यथा, जनतेच्या हितासाठी पर्यायी जागा निवडावी असा सल्ला राजघराण्याकडून आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या रखडलेल्या प्रश्नसंदर्भात खुलासा करण्यासाठी आज राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले व ॲड. शामराव सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपले म्हणणे मांडले. यावेळी राजेसाहेब खेमसावंत म्हणाले की, सावंतवाडी शहरातील राजघराण्याच्या अनेक जमीन तसेच जुन्या इमारती या शहराच्या नूतनीकरणासाठी वेळोवेळी अगदी विना मोबदला दिल्या गेल्या आहेत. विकासाला आम्ही कधीही विरोध केला नाही. उलट नेहमीच सहकार्य केले आहे. आजच्या परिस्थितीतही आम्ही मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी देण्यास तयार आहोत. त्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय करारावर एकदा नव्हे तर तब्बल दोनवेळा आम्ही सह्या केल्या आहेत. जमिनीचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी देखील भरपूर प्रयत्न केले. परंतु, अपिलात गेलेल्या एका व्यक्तीकडून सही रखडली आहे. त्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राजघराण्याकडून सह्या झाल्या नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे. एकूणच, सद्यस्थितीत जनतेमध्ये असाच संभ्रम निर्माण झाला असून आमदार केसरकर यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी जेणेकरून राजघराण्याबाबत जनतेमध्ये कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नयेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी युवराज लखमराजे म्हणाले, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जमिनी संदर्भातील अडचणीबाबत सुरुवातीपासूनच आमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद राहिला आहे. सुरुवातीला काही अटी आम्ही ठेवल्या होत्या. परंतु, नंतर जनहितासाठी त्यामागेही घेतल्या. त्यामुळे आमच्याकडून आता तरी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. अपिलात गेलेल्या ज्या व्यक्तीची सही राहिली आहे ती घेण्याची जबाबदारी आमदार केसरकर यांनी स्वीकारली होती. परंतु, या विषयावरून कुठेतरी आमच्यावर अंगुलीनिर्देश केला जात आहे, हे थांबायला हवे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न पाहता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. आज बऱ्याच रुग्णांना किरकोळ कारणासाठी देखील गोवा- बांबोळीवारी करावी लागते, हे थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी मल्टिस्पेशालिटी सावंतवाडी शहरात अन्य कोणत्याही जागी झाले तरी त्याचा फायदा जनतेलाच होणार आहे. त्यामुळे शासनाने मल्टिस्पेशालिटीच्या आत्ताच्या जमीन प्रश्नाबाबत येत्या दोन महिन्यांमध्ये काय तो निर्णय घ्यावा. अन्यथा, पर्यायी जागा निवडावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
संकेश्वर बांदा रस्ता सावंतवाडी शहरातून जाणे कठीण : खेमसावंत भोंसले
नियोजित संकेश्वर बांदा रस्ता सावंतवाडी शहरातून होऊ शकतो का ? असा सवाल केला असता हा महामार्ग शहरातून जाणे कठीण असल्याचे राजेसाहेब खेमसावंत म्हणाले. शहरातील अस्तित्वात असलेला रस्ता आधीच अरुंद आहे. त्यामुळे नव्या संकेश्वर बांदा महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादित करण्यास अडचणी येऊ शकतात. अनेकांची घरे मालमत्ता त्यात जाऊ शकते. शहराचा पलीकडच्या काळात झालेला विकास पाहता
तसेच उंच सखल भाग पाहता रस्ता शहरातून जाणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.