
सावंतवाडी : रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी तुंबल्याने व्यापारी वर्गांचे मोठे नुकसान झाले. मात्र, ही परिस्थिती नेमकी कशाने ओढवली यासाठी नगरपालिका प्रशासनाने बाजारपेठेतील गटारांचा तसेच अन्य तांत्रिक बाबींचा विचार करून आवश्यक ती उपाययोजना राबवावी. शक्यतो बंदिस्त गटार व नाले माणसे उतरून साफ करावी. जेणेकरून भविष्यात पुन्हा पाणी तुंबण्याचे प्रकार घडू नये अशी मागणी व्यापारी संघाच्यावतीने मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या जवळ करण्यात आली.
शहरात रविवारी दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने पूर्णतः मुख्य बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचले होते. शहरातील मॅंगो हॉटेल ते गांधी चौक परिसर पूर्णतः यामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी जाऊन आतील सामानाचेही मोठे नुकसान झाले. अचानक पाणी आल्याने व्यापाऱ्यांना काहीच हालचाली करता आल्या नाहीत. एकूणच ही परिस्थिती नेमकी कशाने ओढवली याचा विचार होऊन पुन्हा असे संकट उडवू नये यासाठी व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची भेट घेतली. यावेळी
यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर,उपाध्यक्ष आनंद नेवगी,पुडलिंक दळवी, आसिफ बिजली,रंजन रेडकर,दत्ता सावंत,संदेश परब, संतोष मुंज, बाळ बोर्डेकर आदी उपस्थित होते.
शहरातून जाणारा मुख्य नाला हा नरेंद्र डोंगराच्या पायथ्यापासून सुरू होतो. परंतु हा नाला बहुतेक ठिकाणी बंदिस्तच असल्याने आतमध्ये सासलेला कचरा किंवा अन्य गोष्टी साफ न झाल्याने पाण्याला अडथळा होऊन पाणी शहरांमध्ये अन्य भागात घुसते. त्यामुळे बंदिस्त असलेले नाले तसेच गटार माणसे उतरवून यंत्रसामुग्रीद्वारे साफ करण्यात यावे. बऱ्याच ठिकाणी नाल्यात तसेच गटारामध्ये प्लास्टिक बॉटल कचरा अडकून पडलेला आहे. त्यामुळे पाणी निचरा होण्यास अडथळा होतो. दुसरीकडे शहरातील बांधकाम व्यवसायिकांनी बांधकाम परिसरात टाकलेले वाळू वाहून येऊन ती गटारांमध्ये साचली आहे. ही वाळू बाहेर काढून गटर साफ करणे गरजेचे आहे. तसेच संबंधित बांधकाम व्यवसायिकांना आवश्यक त्या सूचनाही देणे गरजेचे आहे. तसे झाल्यास बऱ्यापैकी पाणी निचरा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तात्काळ यावर विचार करून उपाययोजना राबवा असे उपस्थित व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. रविवारचा पाऊस लक्षात घेता दुपारच्या वेळी एक दोन तासात पावसाचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळे या कालावधीतच पाणी शहरांमध्ये तुंबले. शहरातील गटारांची पहाणी ही पालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे.
लवकरच आपली मागणी लक्षात घेता बंदिस्त गटार आणि नाले माणसे उतरवून साफ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तशी यंत्रणा आम्ही राबवणार आहोत. शहरात पुन्हा पाणी तुंबण्याचा प्रकार होऊ नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेणार आहोत असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी श्री.साळुंखे यांनी दिले.










