सावंतवाडी : दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण काही ना काही प्लॅन करत आहेत. नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यात पर्यटकांची पावले कोकणच्या दिशेन वळत आहेत. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सावंतवाडीला पर्यटकांनी विशेष पसंती दिलेली दिसून येत आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोजकेच दिवस शिल्लक असताना मुलांना शाळेला सुट्ट्या पडल्याने अनेकजण कुटुंबासह किंवा मित्रांसह कोकणात येत आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे. वेंगुर्ला, मालवण व गोवा राज्याला लागून असलेल्या ऐतिहासिक नगरी सावंतवाडीत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील हॉटेल, रिसॉर्ट, लॉजिंगच आगाऊ बूक झाली आहेत. त्यात लग्नसराईचीही धामधूम सुरू आहे. शालेय मुलांच्या सहली सावंतवाडीत भेट देत असल्याने सावंतवाडी पर्यटकांनी फुलून गेल आहे. चिताराळी येथे लाकडी खेळणी घेण्यासह कोकणी काजू मेवा दुकानात पर्यटक गर्दी करत आहेत. गोवा राज्य लगत असल्याने सध्या विमान प्रवास महागल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे, बस तिकीटांसह खासगी वाहन देखील आगावू बुक झालीत. कोकणकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून अनेकांनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यासह सावंतवाडी तसेच वेंगुर्ला, मालवण किनारपट्टी भागाला अधिक पसंती दिली आहे. येथील लज्जतदार मेजवानीवर ताव मारण्यासाठी छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये झूंबड उडताना दिसत आहे. ग्रामिण भागातील 'होम स्टे'चा पर्याय शहरी भागातील पर्यटक अधिक निवडत आहेत. शहराच्या धकाधकीच्या जीवनातून शांत व स्वर्गीय आनंद ग्रामीण भागात विसावणारे पर्यटक घेत आहेत. आंबोलीत हिवाळी थंडीचा अनुभव घेणारे पर्यटक गारठले आहेत. लाखो पर्यटक सध्या कोकणात दाखल होत असून येणाऱ्या दिवसात हा परिसर गर्दीने हाउसफुल्ल झालेले दिसणार आहे.
दरम्यान, सावंतवाडी येणाऱ्या पर्यटकांसाठी ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन दृष्ट्या महत्त्वाची असणाऱ्या ठिकाणांना शासनाच्या माध्यमातून उर्जितावस्था व अधिकची चालना मिळावी अशी मागणी देखील स्थानिकांतून केली जात आहे.