
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील नगरपरिषद व पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर झाली. यात नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला तर सभापती पदासाठी महिलांचा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे. त्यामुळे नगरपरिषद आणि पंचायत समितीत महिलाराज चालणार आहे. दोन्हीकडे इच्छुक असलेल्या पुरूष मंडळींचा पत्ता कट झाल्याने महिलांचा कोणता चेहरा या पदावर असणार याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
नुकतच राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. डिसेंबर, जानेवारी कालावधीत नगरपालिका निवडणुका होणार असून अध्यक्षपदांची आरक्षण सोडत निघली. यात सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी महिला सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या प्रथम नागरिक पदावर बसण्याची संधी महिलेला मिळाली आहे. जवळपास १४ वर्षांनी पुन्हा एकदा महिलांना संधी चालून आली असून सोडती नंतर प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत होणार आहे. यापूर्वी हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. त्यामुळे आता महिलांकडे ही संधी गेली असून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात महायुतीतून नगराध्यक्षपद पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. संभाव्य उमेदवार म्हणून महायुतीतील घटक पक्षांतून माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या पत्नी सौ. संजना परब, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतून कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, समीरा खलिल यांची नावं चर्चेत आहे. तर डॉक्टर, वकील, प्राध्यापक अशाही काही नावांची चाचपणी सुरू असून ती नाव गुलदस्त्यात आहे. विशेषतः दोन्ही शिवसेनेकडून त्यावर अधीक भर दिला गेला आहे. तसेच काही विद्यमान व माजी नगरसेविकांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचेही नाव चर्चेत आहे. बड्या पक्षाचे बडे नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे थेट नगराध्यक्षपदासाठी कोणता चेहरा द्यावा यासाठी नेत्यांचा कसं लागणार आहे. त्यात माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा दावा केला आहे. महायुतीच्या बैठकीत ही भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेकडून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब नेतृत्व करणार असून भाजपकडून पालकमंत्री नितेश राणेंसह दस्तुरखुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच लक्ष असणार आहे. दोन्ही पक्षांची स्थानिक नेते मंडळी देखील प्रमुख भुमिका बजावणार आहेत. महाविकास आघाडीकडून कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी (श.प.) विधानसभा प्रमुख अर्चना घारे परब, शिवसेना (उबाठा) विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ नेतृत्व करण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेवर आतापर्यंत तिनं महिला नगराध्यक्षा होऊन गेल्या आहेत. यामध्ये अनारोजीन लोबो यांना पहिल्या नगराध्यक्षा म्हणून सन्मान मिळाला आहे. तसेच श्वेता शिरोडकर, पल्लवी केसरकर यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यामुळे यावेळच्या नगराध्यक्षा चौथ्या नगराध्यक्षा ठरणार आहेत. आतापर्यंत नगराध्यक्ष म्हणून अब्दुल काझी, डॉ. हरी परुळेकर, राजाराम सावंत, डॉ. गणेश लेले, अनंत पंडित, लुईस फर्नांडीस, ॲड. वसंत नार्वेकर, दत्ताराम पंडित, डॉ. धोंडी माने. दत्ताराम वाडकर, ॲड. दिलीप वसंत नार्वेकर, आनारोजीन लोबो, दीपक केसरकर, श्वेता शिरोडकर, पल्लवी केसरकर, प्रेमानंद उर्फ बबन साळगांवकर व सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी कारभार हाकला आहे. सर्वाधिक वेळा नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मिळवला आहे.
दरम्यान, पंचायत समिती सभापतीपदाचा विचार करता यावेळचे सभापतीपद महिलांच्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समितीवर पुन्हा एकदा 'महिलाराज' पाहायला मिळणार आहे. यावेळच्या सभापती २४ व्या सभापतीपदी ठरणार आहेत. मागील कार्यकाळातही सभापतीपद महिलांकडेच होते. यापूर्वी सुशिला गावडे, वृंदा सारंग, गौरी पावसकर, प्रियांका गावडे, निकिता सावंत, मानसी धुरी यांनी सभापती म्हणून यशस्वीपणे काम पाहिले होते. यावेळच्या सभापती ९ व्या महिला सभापती ठरणार आहेत. आता अनुसूचित जाती महिलेसाठी जागा राखीव झाल्याने या प्रवर्गातून कोणत्या महिलेला २४ व्या सभापतीपदाची संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आरक्षण जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख राजकीय गटांकडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. सभापतीपदासाठी योग्य 'अनुसूचित जाती महिला' उमेदवाराला संधी देण्यासाठी दोन्ही गट तयारीला लागले आहेत. आतापर्यंत भगवान देसाई, अशोक दळवी, जगन्नाथ डेगवेकर, दत्ताराम रेगे, भास्कर मसुरकर, रमेश गावकर, सुशीला गावडे, प्रकाश कवटणकर, चंद्रकांत गावडे, वृंदा सारंग, आत्माराम पालेकर, राजेंद्र परब, गौरी पावसकर, प्रियांका गावडे, प्रमोद सावंत, रविंद्र मडगांवकर,
निकिता सावंत, पंकज पेडणेकर, मानसी महेश धुरी, वसंत राऊळ यांनी काम पाहिले आहे. २०२२ ला निकिता सावंत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकीय राजवट लागू होती. त्यामुळे आता २४ व्या सभापतीपदी बसण्याचा मान कोणाला मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे.










