
सावंतवाडी : बाळाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरू न शकलेल्या एका २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सावंतवाडी तालुक्यातील माजगाव-गरड येथे ही घटना घडली आहे. प्रीती प्रल्हाद केतकर पूर्वाश्रमीची तनुजा मनोहर बागडी असे मृत विवाहितेचे नाव आहे.
शुक्रवारी २० फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० ते ६:३० च्या सुमारास प्रीती यांनी माजगाव येथील आपल्या राहत्या घरी बेडरूममधील पंख्याला ओढणीने गळफास घेतला. घरात कुणीही नसताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रीती यांचा विवाह एप्रिल २०२५ मध्ये झाला होता. लग्नानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांना बाळ झाले. मात्र, अवघ्या तीन महिन्यांचे असताना त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. पोटच्या गोळ्याच्या निधनामुळे त्या प्रचंड नैराश्यात होत्या. याच निराशेपोटी त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून दिली आहे.











