कवी राजेंद्र ठाकूर यांच्या ‘माझे माहेर आंगणेवाडी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Edited by: संदीप देसाई
Published on: February 21, 2026 14:04 PM
views 12  views

सिंधुदुर्ग  : डांगमोडे येथील संवेदनशील कवी राजेंद्र विठ्ठल ठाकूर यांच्या आईच्या माहेर असलेल्या आंगणेवाडीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘माझे माहेर आंगणेवाडी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आंगणेवाडी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांच्याहस्ते उत्साहात संपन्न झाले. या काव्यसंग्रहातून कवीने आपल्या आईच्या माहेरच्या जीवनप्रवासाचे भावस्पर्शी चित्रण केले आहे. आईची महती, तिच्या बालपणीच्या आठवणी, माहेर व सासरच्या आयुष्यातील काही प्रसंग यांचा कवितांमधून जिवंत आढावा घेण्यात आला आहे. या कविता केवळ कवीच्या आईपुरत्याच मर्यादित नसून, त्या कोकणातील एका काळाच्या सांस्कृतिक आणि भावविश्वाच्या आठवणी जपणाऱ्या ठरतात. या कविता म्हणजे जणू त्या काळातील आठवणींच्या कॅमेऱ्यातून साकारलेला एक जिवंत कवितांचा अल्बमच असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.

या काव्यसंग्रहाच्या निर्मितीसाठी सिद्धी फ्रेंड्स पब्लिकेशनचे संचालक व प्रकाशक सुभाष मनोहर कुदळे, निशिकांत गोवर्धन महांकाळ तसेच सुशांत दोडके यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रकाशन प्रसंगी बाळा आंगणे,  संदीप आंगणे, विलास आंगणे,  दिपक आंगणे, दिनेश आंगणे,  अनिल कावले,  हेमंत ठाकूर तसेच कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमात काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे वाचन करण्यात आले आणि उपस्थितांनी कवीचे अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.