
कुडाळ : "समाजकारणावर निस्सीम श्रद्धा ठेवून राजकारण करणारे पुष्पसेन सावंत हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे नेते होते. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल," असे प्रतिपादन उमेश गाळवणकर यांनी केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये माजी आमदार कै. पुष्पसेन सावंत यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी गाळवणकर यांनी सावंत यांच्या दिलदार आणि धाडसी नेतृत्वाच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमात पुष्पसेन सावंत यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकताना गाळवणकर म्हणाले की, सावंत यांनी समाजवादाचा विचार जपला. एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि आयुष्यातील अनेक धाडसी प्रसंग आजही प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात जनता दल, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
प्रा. अरुण मर्गज यांनी श्रद्धांजली अर्पण करताना पुष्पसेन सावंत यांच्या 'ट्रक ड्रायव्हर ते आमदार' या थक्क करणाऱ्या प्रवासाचे विवेचन केले. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता, शिक्षण संस्था चालक आणि प्रगतशील शेतकरी अशा त्यांच्या विविधांगी पैलूंची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. आजच्या तरुण पिढीने त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या लोकोत्तर नेत्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी: उमेश गाळवणकर, प्रा. अरुण मर्गज , शांभवी मर्गज-आजगावकर, अश्विनी पालव, मानसी धुरी, संगीता आकेरकर यांच्यासह संस्थेचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










