भव्य 'महास्वच्छता मोहीम'

'पेहेल २०२६' ई-कचरा संकलन अभियानाचा शुभारंभ
Edited by: विनायाक गांवस
Published on: February 20, 2026 17:50 PM
views 21  views

सावंतवाडी : स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषदेने शहरात भव्य 'महास्वच्छता मोहीम' आणि 'पेहेल २०२६' ई-कचरा संकलन अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते बाहेरचा वाडा आणि भटवाडी येथून झाला. आज पासून 23 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण शहर स्वच्छतेच्या या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेऊन संपूर्ण शहर स्वच्छ करावे असे आवाहन यावेळी श्री. निरवडेकर यांनी केले. 

या अभियानामध्ये सावंतवाडी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांनी स्वतः परिसराची साफसफाई केली. यावेळी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेविका सौ दिपाली भालेकर, सौ सुनीता पेडणेकर, नगरसेविका मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते. शहरातील प्रत्येक प्रभागातील अशा ३ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. "सावंतवाडीला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनवण्यासाठी नागरिकांनी, गृहनिर्माण सोसायट्यांनी आणि व्यापारी प्रतिष्ठानांनी या दोन्ही उपक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी श्री. निरवडेकर यांनी यावेळी केले. जिथे सर्वाधिक कचरा आढळतो. रस्ते साफसफाई, झाडीझुडपे काढणे आणि 'जीव्हीपी पॉइंट' (कचरा कुंडीमुक्त ठिकाणे) स्वच्छ करणे यावर भर दिला जात आहे. ‌या मोहिमेत नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी वैभवकुमार अंधारे विनोद सावंत देविदास आडारकर दीपक म्हापसेकर सपना नाईक शितल वाळके संजीवनी शिरसाट मनोज शिरोडकर परवीण शेख शुभम गवळी दिनेश भोसले तुषार सरडे टिळाजी जाधव मनोज राऊळ माधवी म्हापसेकर नेहा आडेकर प्रदीप सावरवाडकर नागेश बिद्रे आदी सह कर्मचारी व सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. स्थानिक नगरसेवक नगरसेविका, पालिकेचे कर्मचारी, शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि सार्वजनिक मंडळे प्रत्यक्ष मैदानात  उतरली होती. पहिल्या दिवशीच्या स्वच्छता मोहिमेमध्ये श्रावणी महिला बचत गट, सखी महिला बचत गट, ईस्वटी महिला बचत गटामधील महिला भरती परब सायली लांबर सुप्रिता धारणकर आरती सुभेदार दीपा गावडे पूजा नाईक अनिशा राणे कल्पना हळदणकर, शीतल मेस्त्री आदी महिला स्वच्छता अभियानला उपस्थित होत्या. तसेच वि. स. खांडेकर शिक्षक व विध्यार्थी भटवाडी नागरिक उपस्थित होते. 

प्रभाग क्रमांक दोन मध्ये सखी महिला बचत गट, श्री महिला बचत गट,श्रावणी महिला बचत गट, श्री गुरुदत्त महिला बचत गट, साई दत्त महिला बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या. पहिल्या दिवशी ढोरे पानंद भटवाडी वेदशाळा परिसर, बाहेरचा वाडा लाखे वस्ती एसटी बस स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. महास्वच्छता अभियान उद्यापासून प्रभाग क्रमांक चार मधील मदारी पिंपळ,जीव्हिपी पॉईंट परिसराच्या सफाईने सुरुवात होणार आहे. त्यानंतर प्रभाग पाच मधील नरेंद्र डोंगर, भागीरथी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराची सफाई केली जाणार आहे. रविवारी 22 फेब्रुवारीला प्रभाग क्रमांक सहा मधील पई पाणंद ते कंटक पाणंद, कळसुलकर इंग्लिश स्कूल,दर्पण रेसिडेन्सी परिसराची सफाई केली जाणार आहे. याच दिवशी प्रभाग क्रमांक सात मधील जे जे मेडिकल स्टोर ते हेल्थ पार्क परिसर शिल्प ग्राम त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ मधील महाडेश्वर पानंद ते वनविभाग कार्यालय परिसर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत स्वच्छता केली जाणार आहे. याशिवाय आयटीआय परिसराची ही सफाई केली जाणार आहे.  सोमवार 23 फेब्रुवारीला प्रभाग क्रमांक नऊ मधील मराठा समाज वसतिगृह परिसर, पोलीस लाईन परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान राजवाडा ते सावंतवाडी एसटी बस स्थानक परिसर याशिवाय मोती तलाव परिसराची स्वच्छता केली जाणार आहे.