
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या जैवविविधतेच्या वारशामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पक्ष्यांचा मोठा वावर पाहायला मिळतो. सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर हे पक्षी वैभवाचे केंद्र असून या ठिकाणी नुकत्याच झालेल्या 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट'मध्ये ५२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.
'कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथोलॉजी' आणि 'नॅशनल ऑडुबोन सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तरावर हा उपक्रम राबवण्यात येतो. या अंतर्गत 'वाईल्ड कोकण सावंतवाडी' संस्थेच्या वतीने नरेंद्र डोंगरावर पक्षी गणना करण्यात आली. या गणनेत हळद्या, कोतवाल, निळ्या डोक्याचा कस्तूर, हरियाल, श्यामा, हॉर्नबिल (धनेश) आणि ऑरेंज मिनीवेट यांसारख्या देखण्या पक्ष्यांचे दर्शन झाले. या उपक्रमात वाइल्ड कोकणचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर यांच्यासह डॉ. गणेश मर्गज, अभिमन्यू लोंढे, ज्ञानेश नाईक, अश्वेक गवस, कोमल कांबळी आणि डेसमॉंड लोबो हे पक्षीमित्र सहभागी झाले होते. नरेंद्र डोंगरावरील पक्ष्यांचा किलबिलाट पक्षीप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरत असून, या गणनेमुळे येथील जैवविविधतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.










