
कणकवली : कणकवली बसस्थानकासमोरील उत्कर्षा लॉजमध्ये दोन दिवसांपासून भाड्याने राहत असलेला एक तरुण मृतावस्थेत आढळून आला आहे. याबाबतची माहिती लॉजचे मालक नंदकुमार आरोलकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पुणे, कर्वेनगर येथील अलंकार अशोक नाईक (वय ३५ )हा तरुण कणकवली येथे १३ फेब्रुवारी रोजी आला होता. बसस्थानकासमोरील उत्कर्षा लॉजमध्ये त्याने राहण्यासाठी खोली बुक केली होती. लॉजमधील कामगार पार्थ रंजन पोयेकर हा १६ फेब्रुवारी रोजी भाडे विचारण्यासाठी अलंकार याच्या खोलीजवळ गेला. दरवाजा बंद असल्यामुळे त्याने आवाज दिला. मात्र, काहीच प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे पार्थ याने त्याचे मालक नंदकुमार आरोलकर यांना संबंधित घटनेची माहिती दिली. त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अलंकार नाईक याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते मृत झाल्याचे घोषित केले. अलंकार याच्या हाताच्या मुठी आवळलेल्या होत्या. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार गुणीजन करत आहेत.










